‘प्रधानमंत्री सूर्यघर विनामूल्य वीज योजने’त राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार !

कोल्हापूर – घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून विनामूल्य वीज मिळवण्याच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर विनामूल्य वीज योजने’त राज्यात २५ सहस्र ८६ ग्राहकांनी १०१.१८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवल्याने राज्याने १०० मेगावॅटचा टप्पा पार केला आहे. या योजनेत केंद्र सरकारच्या वतीने ३ किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ सहस्र रुपयांपर्यंत अनुदान मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात चालू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसवणार्‍या २५ सहस्र ८६ ग्राहकांना अनुदानाची १६० कोटी रुपये रक्कम थेट हस्तांतरित करण्याचे काम चालू आहे.

काय आहे प्रकल्प ?

पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये प्रत्येक महिन्यात ३०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी घरांना ‘रुफटॉप सोलर यंत्रणा’ बसवण्याचे  उद्दिष्ट घोषित केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर ‘रुफटॉप सोलर यंत्रणा’ बसवण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प ७५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचा आहे. यात ग्राहकांच्या आवश्यकतेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास वीजदेयक शून्य होते आणि शिल्लक वीज महावितरण विकत घेते.