दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बॅगेतून मृतदेह नेणार्या दोघांना अटक !;पनवेल येथे खड्ड्यांमुळे तरुणीचा मृत्यू !…
बॅगेतून मृतदेह नेणार्या दोघांना अटक !
मुंबई – दादर रेल्वेस्थानकात २ मूकबधीर व्यक्ती मोठी बॅग तुतारी एक्सप्रेसध्ये चढवत होत्या. बॅगेचे वजन प्रचंड असल्याने त्यांना घाम फुटला होता. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना बॅग उघडण्यास सांगितले. बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांनीच ही हत्या केली असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोकणात जात असल्याचे मान्य केले. या वेळी पळून गेलेल्या त्यांच्या एका सहकार्यालाही पोलिसांनी अटक केली.
पनवेल येथे खड्यांमुळे तरुणीचा मृत्यू !
पनवेल – तरुणी मित्रासमवेत पळस्पे ते जे.एन्.पी.टी. मार्गावर नांदगाव पुलावरून जात असतांना त्यांच्या दुचाकीचे चाक खड्ड्यात आदळल्याने दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्या वेळी मागून येणार्या भरधाव ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने २४ वर्षीय तरुणी ठार झाली. ट्रेलरचालक पळून गेल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : अजून किती जणांचे प्राण गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे ?
टोमॅटोचा दर अल्प !
मुंबई – दोन महिन्यांपासून टोमॅटोचा भाव वाढल्याने ग्राहकांनी खरेदी अल्प केली होती. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याने राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले. त्याची आवक वाढली. मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागांत टोमॅटोचा दर अर्ध्याहून खाली आला आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा
पालघर – जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील २८ विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
केरळ आणि आसाम यांना महाराष्ट्राकडून अर्थसाहाय्य !
मुंबई, ६ ऑगस्ट (वार्ता.) – वायनाड येथे झालेले भूस्खलन आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेली पूरस्थिती यांमुळे झालेली जीवित अन् वित्त हानीच्या पार्श्वभूमीवर केरळ आणि आसाम या दोन्ही राज्यांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून प्रत्येकी १० कोटी रुपये अर्थसाहाय्य घोषित केले आहे.
९८ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ देहलीत !
पुणे – येणारे ९८ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ देहली येथे होणार असल्याचे ‘साहित्य महामंडळा’च्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनासाठी ७ ठिकाणांहून निमंत्रणे प्राप्त झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, देहली आणि इचलकरंजी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पडताळणी केली होती. ७ दशकांनंतर देहली येथे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी १९५४ मध्ये देहली येथे मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.