बांगलादेशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे ! : S Jaishankar
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली माहिती
नवी देहली – बांगलादेशात(Bangladesh) अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. आम्ही त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. चिंतेची गोष्ट म्हणजे अनेक शहरांमध्ये अल्पसंख्य समाजाची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. हिंसाचार किती प्रमाणात झाला, हे अद्याप कळलेले नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक संस्था पुढे आल्याचे वृत्त आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो; परंतु कायदा आणि सुव्यवस्था सुधारेपर्यंत आम्ही काळजीत राहू. ही परिस्थिती पहाता आमच्या सीमा सुरक्षा दलांनाही विशेष सतर्क रहाण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी राज्यसभेत बांगलादेशातील स्थितीविषयी बोलतांना दिली.
एस्. जयशंकर (S Jaishankar) यांनी सांगितले की, बांगलादेशात जुलैपासून हिंसाचार चालूच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही तेथे हिंसाचार चालू आहे. भारत सरकार बांगलादेशी अधिकार्यांच्या संपर्कात आहे. तिथे पोलिसांवरही आक्रमणे होत आहेत. शेख हसीना यांनी भारतात येण्याची विनंती केली होती. तसेच आम्हाला बांगलादेश अधिकार्यांकडून हवाई उड्डाणासाठी अनुमती देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर शेख हसीना भारतात पोचल्या. आम्ही आमच्या राजनैतिक यंत्रणांद्वारे बांगलादेशातील भारतीय समुदायाशी जवळच्या आणि सतत संपर्कात आहोत. एका अंदाजानुसार १९ सहस्र भारतीय नागरिक तेथे रहातात. त्यांपैकी सुमारे ९ सहस्र विद्यार्थी आहेत. जुलैमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी परतले होते.
Suo-moto statement in Rajyasabha on the situation in Bangladesh. https://t.co/ceM41AEATE
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 6, 2024
संपादकीय भूमिकाबांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्पसंख्यांक म्हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्या वेळी २८ टक्के असणारे हिंदू आता ८ टक्केही शिल्लक राहिलेले नाहीत. या काळात भारताने त्यांच्या सुरक्षेसाठी काहीही केलेले नाही आणि आताही काही केले जात आहे, असेही नाही ! हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना आणि हिंदूंना लज्जास्पद ! |