मुंदकाईमध्ये (केरळ) बचाव कार्यासाठी तातडीने पूल उभारणार्या ‘मद्रास सॅपर्स’च्या मेजर सीता शेळके आणि त्यांचे पथक !
केरळ राज्यातील वायनाडमध्ये अक्राळविक्राळ भूस्खलनानंतर चुरामला येथे संपर्क तुटलेल्या मुंदकाई गावापर्यंत
साहाय्य पोचवण्यासाठी तातडीने पूल उभारणे आवश्यक होते. लष्कराच्या ‘मद्रास सॅपर्स’चे (‘मद्रास इंजिनियरिंग ग्रुप’चे) ७० जणांचे पथक या कामाला लागले. ३१ घंट्यांच्या अविश्रांत श्रमानंतर हा ‘बेली पूल’ (कुठेही स्थलांतरित करता येणारा एक प्रकारचा लोखंडी पूल) उभारण्यात आला आणि मुंदकाईपर्यंत बचाव अन् साहाय्य कार्य करणार्यांना धाव घेता आली. ‘मद्रास सॅपर्स’च्या लष्करी अभियंत्यांच्या पथकाचे नेतृत्व मराठमोळ्या मेजर सीता अशोक शेळके यांनी केले. त्यांच्या या कामगिरीमुळे मेजर सीता शेळके यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मूळच्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेल्या मेजर सीता शेळके या वर्ष २०१२ मध्ये लष्करात भरती झाल्या. त्यांनी चेन्नईच्या लष्कराच्या मुख्यालयात प्रशिक्षण घेतले. त्यांची नियुक्ती लष्कराच्या ‘मद्रास इंजिनियरिंग ग्रुप’ अर्थात् ‘मद्रास सॅपर्स’मध्ये झाली. अवघड आणि दुर्गम भागांत लष्कराला पोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम या ‘सॅपर्स’कडे असते. याच तुकडीला वायनाडला बोलावण्यात आले होते; कारण होते मुंदकाई गावात पोचण्याचे ! मुंदकाईवर शब्दशः आभाळ कोसळले होते. डोंगराचा मोठा भाग या गावावर पडला. गावात जाण्यासाठी असलेला पूलही या प्रलयात वाहून गेला. त्यामुळे जगाशी संपर्क तुटला. बचाव अन् साहाय्य कार्य यांसाठी तेथे जाण्याची कोणतीच सुविधा नसतांना ‘मद्रास सॅपर्स’ने हे काम हाती घेतले.
मेजर सीता शेळके यांनी त्यांच्या पथकासह ३१ घंटे क्षणभरही विश्रांती न घेता १९ पोलादी पॅनल्सच्या साहाय्याने हा पूल उभारला. पूल सिद्ध झाला आणि त्यावरून बुलडोझर, जेसीबी यांसारखी अवजड यंत्रसामुग्री, रुग्णवाहिका तातडीने मुंदकाईकडे रवाना होऊ लागली. मेजर सीता शेळके यांची पुलाची उभारणी करतांनाची छायाचित्रे प्रसारित झाली आणि त्या केरळातच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘हिरो’ (नायिका) ठरल्या. सामाजिक माध्यमे वापरकर्त्यांनी मेजर सीता यांना ‘वाघीण’ अशी उपमा दिली, तसेच प्रतिकूल परिस्थितीत काम करत गरजवंतांपर्यंत साहाय्य पोचवण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले.
(साभार : विविध संकेतस्थळे)