विश्वकवी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर !
आज ‘गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) स्मृतीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांचे जीवन ‘सत्यम् शिवम् सुंदरम् ।’ याचा अद्भुत संगम होता. त्यांनी दर्शन, साहित्य, चित्रकला, संगीत, नाट्यकला, शिक्षणशास्त्र आणि त्याचा प्रसार इत्यादी निरनिराळ्या विषयांतील स्वातंत्र्य आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेऊन देशाची अतुलनीय सेवा केली होती. गुरुदेव रवींद्रनाथ यांचे जीवन आणि महत्त्वपूर्ण घटना यांची माहिती येथे देत आहोत.
१. जन्म आणि बालपण
७ मे १८६१ या दिवशी कोलकाता येथील ‘जोरासांकाें की महलनुसा’ (ठाकूरांचे घर) या त्यांच्या पूर्वजांच्या हवेलीत रवींद्रनाथांचा जन्म शारदादेवी यांच्या पोटी झाला. रवींद्रनाथांच्या माताजी शारदादेवी यांची प्रकृती सततच्या कामामुळे नाजूक रहात असे. जमीनदारीच्या कामासाठी वडील सतत बाहेर रहात असत. रवींद्रनाथ यांचे पालनपोषण करण्याचे दायित्व विशेषत: सेवकांवरच असे. रवींद्रनाथांनी त्यांचे बालपण आणि किशोरावस्था याचे वर्णन ‘भृत्यराजतंत्र’ (सेवकांची राज्यप्रणाली) हे विशेषण देऊन केले आहे.
२. कुटुंबीय
त्यांच्या कुटुंबावर माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांचा वरदहस्त होता. त्यांच्या पूर्वजांपैकी ठाकूर भट्टनारायण यांनी प्रसिद्ध संस्कृत नाटक ‘वेणी संहारम्’ याची रचना केली होती. त्यांचे आजोबा हे अरबी, फारसी, संस्कृत या भाषांचे विद्वान आणि एक प्रतिष्ठित समाजसेवक होते. वडील देवेंद्रनाथ धर्मनिष्ठ विद्वान आणि समाजसेवी होते. राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेल्या ‘ब्राह्मोसमाज’ या संस्थेचे कार्य त्यांनी पुढे नेले होते. त्यांचे कुटुंब धर्म, संस्कृती, साहित्य आणि राष्ट्रवाद यांचा संगम होता. त्यांचा परिवार पुष्कळ मोठा होता.
३. वयाच्या ११ व्या वर्षी रवींद्रनाथांनी लिहिली पहिली कविता !
रवींद्रनाथांचे अधिकांश शिक्षण सामान्यपणेच झाले आहे. मोठी हवेली आणि आजूबाजूला असलेले भरपूर नैसर्गिक सौंदर्य या वातावरणात त्यांना कविता स्फुरल्या. मोठे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ आणि काव्यरसिक वहिनी कादंबरीदेवी यांच्या प्रेरणेमुळे रवींद्रनाथ यांचे कवित्व अन् संगीत यांचा विकास झाला. वयाच्या ११ व्या वर्षी रवींद्रनाथांनी पहिली कविता लिहिली.
४. शिक्षण
रवींद्रनाथ यांचे एक भाऊ सत्येंद्रनाथ यांच्यासह इंग्रजी शिकण्यासाठी काही काळ ते कर्णावती (अहमदाबाद) येथे राहिल्यानंतर वर्ष १८७८ मध्ये ते इंग्लंडला गेले. रवींद्रनाथ पदवी न घेता भारतात परत आले होते; परंतु इंग्लंडच्या प्रवासाच्या वेळी इतर अनेक इंग्रज आणि भारतीय प्रवासी यांच्याशी त्यांची मैत्री झाली, ज्याचा त्यांना भविष्यात लाभ झाला.
५. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या २ कविता भारत आणि बांगलादेश या देशांचे राष्ट्रगीत बनणे
१४ व्या वर्षी कोलकाता येथील प्रसिद्ध हिंदु मेळाव्यात रवींद्रनाथ यांनी स्वत: रचलेली कविता म्हटली. वर्ष १८०५ मध्ये इंग्रजांनी चालू केलेल्या सांप्रदायिक आधारावरील विभागणीच्या विरोधी आंदोलनात रवींद्रनाथ यांनी उडी घेतली. राष्ट्रीयतेने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या कविता जनतेमध्ये जागृती करण्याचे मुख्य साधन झाले. रवींद्रनाथ यांनी लिहिलेल्या कवितेतील ‘जन गण मन…’ आणि ‘आमार सोनार बांग्ला..’ या २ कविता अनुक्रमे भारत अन् बांगलादेश यांचे राष्ट्रगीत बनल्या. ज्यामुळे हे सिद्ध झाले की, भारताची राष्ट्रीयता पंथ किंवा संप्रदाय यांवर आधारित नाही, तर ती भू-सांस्कृतिक आहे.
६. रवींद्रनाथ ठाकूर यांनी आश्रमपद्धतीवर आधारित विद्यालय चालू करणे !
रवींद्रनाथ यांना बालपणापासूनच पश्चिमी पद्धतीवर आधारित असलेल्या कंटाळवाण्या शिक्षणपद्धतीविषयी चीड होती. ‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आश्रमपद्धतीवर आधारित शिक्षणप्रणाली चालू करणे’, हे त्यांचे स्वप्न होते. नैसर्गिक सौंदर्याने युक्त अशा ‘शांतिनिकेतन (बोलपूरनगर, बंगाल)’ या ठिकाणी त्यांनी लहान विद्यालय चालू केले होते. पुढे जाऊन हेच विद्यालय भारतीय संगीत, कला, संस्कृती, भाषा इत्यादींसाठी जगातील प्रसिद्ध केंद्र म्हणून ‘विश्वभारती विश्वविद्यालय’ बनले.
७. रवींद्रनाथ ठाकूर यांनी ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडानंतर इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी सरकारला परत करणे
‘गीतांजली’ या रवींद्रनाथ यांच्या काव्यसंग्रहाच्या इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून त्यांनी पाश्चिमात्य देशांना अत्यंत सुंदररित्या दिव्य ईश्वरी तत्त्वाचे दर्शन करवले. ते एक आश्चर्यच होते. ‘गीतांजली’ला पाश्चात्त्य कवी, दर्शक आणि साहित्यिक यांनी सर्वाेच्च स्थान दिले अन् वर्ष १९१२ मध्ये या काव्यसंग्रहाला प्रसिद्ध अशा ‘नोबेल पुरस्कारा’ने सन्मानित केले गेले. विश्वकवी रवींद्रनाथ एक प्रखर राष्ट्रवादी होते. वर्ष १९१९ च्या ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडानंतर रवींद्रनाथ यांनी इंग्रजांनी त्यांना दिलेली ‘सर’ ही पदवी इंग्रज सरकारला परत केली.
८. मृत्यू
राष्ट्रवाद आणि विश्व बंधुत्व यांना पोषक अशी चतुरस्र प्रतिभा अन् कर्तृत्व यांचे धनी असलेले विश्वकवी रवींद्रनाथ ठाकूर ७ ऑगस्ट १९४१ या दिवशी अनंतात विलीन झाले.’
– डॉ. श्रीलाल, संपादक, गीता स्वाध्याय.
(साभार : गीता स्वाध्याय, वर्ष १३, २.५.२०२२)