संपादकीय : बांगलादेशी हिंदूंना वाचवा !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या हकालपट्टीनंतर तेथे उद्भवलेल्या अराजकामध्ये हिंदूंची काय भयावह स्थिती होत आहे ? याचे एक एक वृत्त आता पुढे येत आहे आणि येत्या काही दिवसांत आपल्या धर्मबंधूंवरील आक्रमणाची अशीच वृत्ते हिंदूंना वाचावी लागणार आहेत. हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी तातडीने या संदर्भात बांगलादेशी सैन्याला सुनावणे आणि मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्यासारख्यांनी तातडीने काही रणनीती आखून तेथील हिंदू आणि मंदिरे यांवरील आक्रमणे थांबवण्याच्या दृष्टीने कृती करणे अपेक्षित आहे. तशी ते कदाचित् करतीलही; मात्र बांगलादेशातील घडामोडींवरील ६ ऑगस्टच्या सर्वपक्षीय बैठकीत एस्. जयशंकर यांनी ‘बांगलादेशातील स्थिती एवढी भयंकर नाही की,
१३ सहस्र भारतीय विद्यार्थी बांगलादेशातून बाहेर पडावेत. या आधी ८ सहस्र भारतीय विद्यार्थी बांगलादेशातून भारतात परतले आहेत’, असे विधान केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. बांगलादेशातील आजचे अराजक आणि त्यामुळे तेथील हिंदूंचे झालेले हाल पहाता भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन्.आर्.सी.) ही विधेयके किती आवश्यक आहेत, हे लक्षात येईल.
बांगलादेशातील हिंदूंचे हाल !
गेल्या ५० वर्षांत हिंदूंची संख्या ७६ लाखांहून न्यून झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये, म्हणजे बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळी २३ टक्के असणारे हिंदू वर्ष २०२१ मध्ये केवळ ८.५ टक्के राहिले होते. एका अहवालानुसार प्रतिवर्षी अडीच लाख हिंदू बांगलादेश सोडतात. ‘हिंदू अमेरिकन फाऊंडेशन’च्या अहवालानुसार वर्ष १९६४ ते वर्ष २०१३ या काळात धार्मिक छळामुळे १ कोटी १० लाखांहून अधिक हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केले. तेथील हिंदू हत्या, दंगली, जाळपोळ, हिंसाचार, अपहरण, स्त्रियांवरील बलात्कार, अराजक आदींमुळे मारले गेले किंवा परागंदा झाले अथवा देश सोडून गेले. तेथील पू. रवींद्र घोष यांच्यासारख्या हिंदूंसाठी अत्यंत तळमळीने आणि क्षात्रवृत्तीने लढणार्या हिंदुत्वनिष्ठांमुळे तेथील हिंदूंवरील काही अनन्वित अत्याचार तरी भारतात समजू लागले. यामध्ये पूर्वीचे खलिदा झिया यांचे भारतविरोधी सरकार असू दे, नाहीतर शेख हसिना यांचे भारताला अनुकूल असणारे सरकार असू दे, तेथील हिंदूंच्या अत्याचारांत काही घट झाली नाही. गेल्या काही वर्षांत तेथील मंदिरांतील पुजारी आदींच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या. तेथील हिंदु मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कारांच्या घटनांविषयी तर शब्दांत सांगणे कठीण आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या ‘लज्जा’ कादंबरीत लिहिलेल्या एका सत्य घटनेत अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार होत असतांना तिच्या आईने जिहाद्यांना उद्देशून काढलेले ‘एका वेळी एकानेच करा, नाहीतर ती मरेल’, हे उद्गार प्रत्येक हिंदूचे काळीज भेदणारे आणि मन हेलावून टाकणारे आहेत. त्यावरून तेथील हिंदूंची किती दयनीय स्थिती झालेली असू शकते, याची कल्पना येते.
आता सध्या तेथे चालू असलेल्या अराजकात इस्कॉनच्या मंदिरासह अन्य ४ हून अधिक मंदिरांना धर्मांधांनी आग लावली. तेथील भक्त कसेबसे जीव मुठीत धरून पळून गेले. वर्ष १९९० मध्येही अशाच प्रकारे तेथील अनेक मंदिरांना आग लावण्यात आली होती. वर्ष २०१६ मध्ये तेथील ४९ मंदिरे नष्ट झाली. आता या अराजकानंतरही तेथील हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड, लूट, आगी लावणे असे चालू झाले आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंच्या (शत्रूच्या) भूमी बळकावणारा एक अत्याचारी कायदा बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून आहे. त्या अंतर्गत वर्ष २००६ पर्यंत हिंदूंची २६ लाख एकरांहून अधिक भूमी मुसलमानांनी बळकावलेली आहे. शेख हसिना यांचे सरकार भारतासाठी सकारात्मक असले, तरी त्यांनाही तेथील कट्टरतावादी जिहादी मुसलमानांचे म्हणणे ऐकून घेतल्याविना गत्यंतर नव्हते. त्यांच्या कार्यकाळातही तेथील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी काही वेगळे प्रयत्न झाले नाहीत.
हिंदूंसाठी भारताची भूमिका !
अमेरिकेच्या प्रतिनिधीने ‘तेथील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांचा आम्ही निषेध करतो’, अशी केवळ पोपटपंची केली आहे. हसिना यांच्या कार्यकाळात बांगलादेशाचा विकास होत होता. त्या विकासात भारताचा मोठा हात होता. अमेरिकेसारख्या स्वार्थी देशांना भारताशेजारील देशांना नेहमी अस्थिर ठेवायचे आहे. त्यामुळे त्यांच्या या तोंडदेखल्या ढोंगी मानवतावादाचे पितळ नेहमीच उघडे पडते. त्यामुळे अमेरिकेला बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी काही खरी कळकळ आहे, असे नाही. तसे असते, तर त्यांनी ते थांबवण्यासाठी बांगलादेशावर दबाव टाकला असता. या आंदोलनाचे नेतृत्व करणारा नाहिद इस्लाम आणि त्याचे मित्र यांना पकडून तेथील पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला होता; मात्र त्याला
सोडून दिल्यावर त्याने हे शमत आलेले आंदोलन अधिक उग्र करून आता अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. ‘हे सर्व होण्यामागे अमेरिकेचाच हात आहे’, अशी शंका काही जण व्यक्त करत आहेत. उद्यापर्यंत सरकार स्थापन होईलही ! या नवीन सरकारमध्ये सल्लागाराची भूमिका वठवू इच्छिणारे महंमद युसुफ यांनी २ दिवसांपूर्वीच भारताला उद्देशून ‘ही आग शेजारील देशांमध्येही पसरू शकते’, अशी गर्भित धमकी दिली होती. भारताने हसिना यांना दिलेल्या, ‘जनरल वकेर-उझ-झमान यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करू नये’, या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याची ही फळे आहेत; कारण त्यांनी आंदोलन शमवण्याचा प्रयत्न न करता, त्याला चालना दिली आहे. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान आणि हसिना यांच्या कट्टर शत्रू खालिदा झिया यांना कारागृहातून मुक्त करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे ‘जमात-ए-इस्लामी’ आणि इस्लामी छात्रशिबिर यांसारख्या जिहादी संघटना आता देश कह्यात घेण्याची दाट शक्यता आहे. भारतविरोधी कारवाया करणार्या तेथील आतंकवाद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून भारतात घुसखोरीची शक्यता प्रचंड वाढल्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाला सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. त्यामुळे बांगलादेशातील हे अराजक भारतासाठी किती मोठी डोकेदुखी ठरणार आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा, ते भारतात आले, तर त्यांचे प्रश्न आणि भारतात घुसलेल्या जिहादी घुसखोरांमुळे भारतीय हिंदूंची असुरक्षितता, हे सारे प्रश्न भारतापुढे आहेत. बांगलादेशातील पीडित हिंदूंना आधार देणे, त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, म्हणून बांगलादेशावर दबाव आणणे, ही सर्व सूत्रे भारताने त्याचे कर्तव्य म्हणून हाताळली पाहिजेत. असे झाले, तर पंतप्रधान मोदी यांचा तेथील आणि येथील हिंदूंना आधार वाटेल अन् भारताची वैश्विक प्रतिमा अधिक उजळेल !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने त्यांना चेतावणी देण्यासह रणनीती आखली पाहिजे ! |