पिंपरी-चिंचवडच्या पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी (जिल्हा पुणे) – मुळा आणि पवना या नद्यांना पूर आल्यानंतर नदीकाठच्या रहिवाशांना प्रतिवर्षी स्थलांतरित व्हावे लागते. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा पर्याय काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले. पिंपरी-चिंचवड शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीला पूर आल्याने मधुबन, मुळानगरसह नदीकाठच्या १ सहस्रांहून अधिक रहिवाशांचे स्थलांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेतील निवारा केंद्रात करण्यात आले होते. त्याची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तेव्हा ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पूरग्रस्तांना सोयी-सुविधा मिळतात का ? आरोग्य सुविधा देण्यात येतात का ? औषधे आणि आजार यांची स्थिती काय ? याची चौकशी केली. आणि त्या योग्य स्वरूपात देण्याविषयीच्या सूचनाही प्रशासनाला केल्या.