सरकारला शेवटची संधी, आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील ! – मनोज जरांगे यांची चेतावणी
विधानसभेत मराठ्यांचीच सत्ता येणार !
जालना – विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही; मात्र सरकारने आता आमची मागणी मान्य न केल्यास दुसरा पर्याय नाही. ही सरकारला शेवटची संधी आहे. आम्ही राजकारणात उतरलो, तर हाल होतील, अशी चेतावणी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे ६ ऑगस्ट या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली, तसेच ‘राज्यभरातील मराठा समाजाच्या आमदारांनी सरकारला समजावून सांगावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या मराठा समाजाचे आंदोलन चालू नाही. समाजाने संयम धरला पाहिजे. सध्या काही लोकांकडून समाजाला उचकवण्याचे काम चालू आहे. सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडले आहेत. मग ते मंत्री छगन भुजबळ यांच्यासारखे ओबीसी नेते असो किंवा भाजपचे मराठा आमदार असोत. आंदोलन करायला लावण्यासाठी हे एक षड्यंत्र आहे.