पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने सतर्क रहावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची सूचना
पुणे – पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणांतून पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरांतील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणार्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजीनगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपिटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागांतील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे प्रशासनाला दिल्या आहेत.
१ सहस्र नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले !
अतीवृष्टीमुळे आणि धरणांतून सातत्याने होणार्या विसर्गामुळे शहरातून वहाणार्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले. शहरातील विविध ठिकाणच्या जवळपास १ सहस्र नागरिकांना ४ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले असून या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी, तसेच साहाय्य आणि बचावकार्य यांसाठी एन्.डी.आर.्एफ्.चे पथक शहरात आले झाले असून बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड या यंत्रणांनाही सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
३ ऑगस्टला रात्री विलंबाने बोपखेल येथील अनुमाने १०० नागरिकांना मनपा शाळेतील निवारा केंद्रामध्ये, तर रिव्हर रेसिडेन्सीजवळील महापालिकेच्या एस्.टी.पी. प्रकल्पातील लेबर कॅम्पमध्ये पाणी घुसल्याने ८० जणांना भोसरी येथे सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले, तसेच जुनी सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर शाळेमध्ये ४० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने ३ सहस्र ५० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद !
संततधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने पुणे, पिंपरी शहर, तसेच खेड, मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील अनुमाने ३ सहस्र ५० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद केला आहे.