प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची राज्याच्या सीमांवर कठोर तपासणी करणार

  • गोवा विधानसभा अधिवेशन

  • प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमुर्तींची पणजी येथे विक्री : कारवाई करणार असल्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आश्वासन

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती

पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर गोव्यात बंदी आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीची गोव्यात आयात रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर कठोर तपासणी करण्याचे निर्देश पोलीस खात्याला देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ५ ऑगस्ट या दिवशी गोवा विधानसभेत दिली. भाजपचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमुर्तींच्या विक्रीवर सरकार कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर बंदी असूनही अशा मूर्ती गोव्यात आणून त्यांची विक्री होत असते. अशा मूर्ती पणजी शहरात विक्रीस आहेत. हा एक गंभीर गुन्हा आहे. अशा मूर्तींची गोव्यातील इतर भागातही विक्री होत असल्यास सरकार यावर कोणती कारवाई करणार आहे ?’’

प्रारंभी उत्तर देतांना पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर सर्वांनी बहिष्कार घालून सरकारला सहकार्य करावे. याविषयी सर्वांमध्ये जागृती करावी. अशा मूर्तींची विक्री होत असल्यास त्याविषयी माहिती द्यावी. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा मूर्तींच्या विक्रीवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ देखरेख ठेवून असते.’’ (गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येक वर्षी देखरेख ठेवण्याचे आश्वासन देते; परंतु प्रत्येक वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कितीतरी श्री गणेशमूर्ती विसर्जित केलेल्या आढळतात. त्या पाण्यात विरघळत नाहीत आणि तरंगतात. यामुळे श्री गणेशाचा अवमान होतो. असे करणार्‍यांची आध्यात्मिक हानी होतेच; पण इतरांच्या धर्मभावनाही दुखावतात. – संपादक)