छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते, तर कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते !

संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांची स्पष्टोक्ती

व्याख्यानाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी

कुडाळ – छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनात स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म हा विचार रुजवला. शिवाजी महाराज कधीच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) नव्हते, तर ते कट्टर हिंदुत्वनिष्ठच होते. शिवाजी महाराजांचे हिंदुत्व समाजासमोर मांडणे, हे प्रत्येक हिंदूचे आता कर्तव्य झाले आहे. हिंदु धर्मावरील धोके अद्याप संपलेले नसून ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आदींच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. हे धोके उखडून टाकणे, ही काळाची आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा संकल्प पुन्हा एकदा सिद्धीस नेण्यासाठी आणि हिंदुत्व रक्षणासाठी पुन्हा एकदा सिद्ध व्हा. हिंदुत्वाच्या कार्यासाठी आपले आयुष्य समर्पित करा, असे आवाहन जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांनी पावशी येथील कार्यक्रमात बोलतांना केले.

बजरंग दल सिंधुदुर्ग आणि शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व’ या विषयावर ह.भ.प. मोरे महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ह.भ.प. शिरीष मोरे महाराज

ह.भ.प. मोरे महाराज पुढे म्हणाले,

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमकांनी पाडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदु अस्मितेचा परिचय करून दिला. सद्य:स्थितीत हिंदु समाजाला जागृत करणे काळाची आवश्यकता आहे.

२. आज आपल्याला ज्यांनी हिंदु धर्मावर आक्रमणे केली, त्यांचा इतिहास शिकवला जात आहे; मात्र या आक्रमकांच्या विरोधात जे लढले त्यांचा पराक्रम आणि हिंदु धर्मावरील  अत्याचार सांगितले जात नाहीत.

३.  केवळ हिंदु होते म्हणून हिंदु राजांवर अनेक अत्याचार करण्यात आले. अनेक मंदिरे लुटण्यात आली. श्री सोरटी सोमनाथाची लूट नाही, तर हिंदूंच्या स्वाभिमानाचीच लूट होती.

४. हिंदु राजांवरील अत्याचार, मंदिरांची लूट असे प्रकार चालू असतांना ते थांबवणारा शिवरायांच्या रूपाने भारताला पहिला हिंदु राजा मिळाला, मग शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ कसे असतील ?

५. हिंदु समाज अत्याचाराने पीडित असतांना जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात हिंदुत्वाचे बीज रोवले. रयतेच्या मनात एक विश्वास निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी माय भगिनींची काळजी घेत शेतकर्‍यांना अभय दिले आणि शेती क्षेत्रातही प्रचंड मोठी क्रांती केली.

६. त्यांनी रयतेच्या मनात स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा विचार रुजवला. शिवाजी महाराजांनी हिंदुत्व या एकाच तत्त्वाला धरून राज्य केल्याने त्यांचे राज्य आजही संपलेले नाही. त्यांनी स्वतःची मुद्रा स्वभाषेत सिद्ध करत स्वभाषा जपली. त्यांनी मराठी भाषेतील हिंदू चलनही निर्माण केले.

७. सर्व प्रदेशात हिंदुत्वाचा झेंडा फडकावा, हिंदु राष्ट्र प्रस्थापित करावे हे त्यांचे स्वप्न होते. आक्रमकांना रोखण्यासाठी स्वराष्ट्र निर्माण केले. बळाने कपटाने ज्यांना बाटवले होते, त्यांना हिंदु धर्मात आणण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले.

८. आजही हिंदु धर्मावर विविध माध्यमांतून संकटे येत आहेत. यासाठी हिंदु समाजाने हिंदुत्व रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करावे.
कार्यक्रमाची सांगता ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हणून करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.