दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : परीक्षेला जाणार्या तरुणीचा अपघाती मृत्यू !; अपघातात होरपळून दोघांचा मृत्यू !…
परीक्षेला जाणार्या तरुणीचा अपघाती मृत्यू !
नागपूर – भावासमवेत दुचाकीवरून बँकिंगच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असलेल्या प्रियंका मानकर (वय २६ वर्षे) हिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिचा भाऊ योगेश आवारे गंभीर घायाळ झाला. ट्रकला मागे टाकण्याच्या नादात दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला.
अपघातात होरपळून दोघांचा मृत्यू !
नाशिक – जिल्ह्यातील नाशिक-दिंडोरी मार्गावर ४ ऑगस्टच्या सायंकाळी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. चारचाकी वाहन सी.एन्.जी.वर असल्याने त्याने पेट घेतला. त्यामुळे बसही पेटली. या अपघातात चारचाकीमधील २ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
श्रावणात एस्.टी.संगे तीर्थाटन !
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांतून श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एस्.टी. संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम चालू करण्यात आला आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य आणि महिलांना अर्ध्या तिकिटात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ एस्.टी. प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एस्.टी. महामंडळाने केले आहे.
ठाणेकरांची जलचिंता मिटली !
बदलापूर – ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार्या ‘महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळा’च्या बारवी धरणात ४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत ९२ टक्के पाणी जमा झाले होते. धरणक्षेत्रात दोन दिवसांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका आणि औद्याोगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
गणेशोत्सवानंतर मुंबई विद्यापिठाची अधिसभा निवडणूक !
मुंबई – गणेशोत्सवानंतर नोंदणीकृत पदवीधर गटाच्या एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे, तर २५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक अधिसूचना घोषित केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून २ उमेदवार!
मुंबई – येणार्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवडी येथून बाळा नांदगावकर, तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी घोषित केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करणारा मनसे हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. राज ठाकरे यांनी मनसे २०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे सांगितले होते.