उजनी धरण ८६ टक्के भरल्याने भीमा नदीपात्रात २० सहस्र क्युसेक पाणी सोडले !
नदीकाठच्या गावांना सावधानतेची चेतावणी !
सोलापूर – उजनी धरणाच्या वरील बाजूस असणार्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून उजनी धरण जलाशय ४ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता ८६ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी ५ वाजता २० सहस्र क्यूसेकने पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना पाटबंधारे विभागाने सूचित केले आहे की, नदीपात्रात कुणीही उतरू नये, नदीमधील शेतीपंप, नदीकाठची शेती अवजारे, तसेच तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हालवण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी.
वीर आणि उजनी धरण यांतून सोडलेल्या विसर्गामुळे भीमा नदी ८१ सहस्र क्युसेकने प्रवाहित होणार आहे. त्यामुळे भीमानदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार असून नदीकाठी रहाणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.