आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी उपयुक्‍त दृष्‍टीकोन

सनातनचा ग्रंथ ‘आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी उपयुक्‍त दृष्‍टीकोन’ यातील काही भाग ५ ऑगस्‍ट या दिवशी पाहिला. आज पुढील दृष्‍टीकोन पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/821537.html

पू. संदीप आळशी

६. आध्‍यात्मिक त्रासांवर मात करता येण्‍यासाठी उपयुक्‍त ठरणारे दृष्‍टीकोन

६ अ. त्रासांमुळे निराश किंवा दुःखी न होता त्‍यांमागील कारणे समजून घेणे : ‘सध्‍या सूक्ष्मातील आपत्‍काळ असल्‍याने त्‍याची झळ सर्वच साधकांना अल्‍प-अधिक प्रमाणात बसत आहे. काही साधकांना सर्वाधिक बसते, म्‍हणजे त्‍यांना अधिक त्रास होतो. अशांपैकी ९० टक्‍के साधकांना वाटते, ‘माझी साधना नीट होत नाही; म्‍हणून मला अधिक त्रास होत आहे.’ असे साधक ‘मला साधना जमत नाही’, ‘माझी सेवा चांगली होत नाही’, यांसारख्‍या विचारांमध्‍ये अडकून दुःखी आणि निराश होतात. अशा साधकांनी त्रासांमागील पुढील कारणे लक्षात घ्‍यावीत.

६ अ १. काळगती (कालमाहात्‍म्‍य) : सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) त्‍यांच्‍या एका भजनात म्‍हटले आहे, ‘काळगतीपुढे बुद्धी काय करी ।’ युधिष्‍ठिर एवढा मोठा धुरंदर, बुद्धीमान आणि धर्मात्‍मा असूनही त्‍याला कौरवांबरोबरच्‍या द्युतात सर्व हरल्‍यावरही स्‍वतःच्‍या पत्नीला ‘पणा’ ला लावण्‍याची बुद्धी झाली, ती काळगतीमुळेच  साधकांनीही या काळगतीचे माहात्‍म्‍य लक्षात घेतले, तर ‘तिच्‍यापुढे आपण काही करू शकत नाही, तिच्‍यामुळे आपल्‍याला आध्‍यात्मिक त्रास भोगावेच लागणार आहेत’, हे सत्‍य पटून त्‍यांना होणारे दुःख आणि निराशा अल्‍प होईल. युधिष्‍ठिर आणि अन्‍य पांडव यांची श्रीकृष्‍णावर दृढ श्रद्धा होती; म्‍हणून ते तरले. त्‍याचप्रमाणे त्रास असणार्‍या साधकांनीही सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा ठेवल्‍यास तेही निश्‍चितच तरतील !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२०.३.२०१५)

सनातनच्‍या लघुग्रंथाचे मुखपृष्‍ठ

६ अ २. प्रारब्‍ध : काही साधकांना आधीच्‍या आणि या जन्‍मातील पापकर्मांची फळे त्रासांच्‍या स्‍वरूपात भोगावी लागतात. संत एकनाथ महाराज यांच्‍या ‘जैसी स्‍थिती आहे तैशापरी राहे । कौतुक तू पाहे संचिताचे ॥’, या उक्‍तीनुसार आपल्‍या संचिताचे कौतुक आपल्‍यालाच केले पाहिजे, म्‍हणजे आपले प्रारब्‍ध आपल्‍यालाच भोगायला हवे ! ते आपण जितके आनंदाने भोगू, तितका आपला त्रास सुसह्य होईल. यासाठी साधकांनी देवाला प्रार्थना करावी, ‘आधीच्‍या पापकर्मांची फळे म्‍हणून मी त्रास भोगत आहे; पण देवा, आता यापुढे माझ्‍याकडून एकही पापकर्म घडू देऊ नकोस.’

६ आ. त्रासांकडे सकारात्‍मक दृष्‍टीने पहाणे

६ आ १. ‘त्रास भोगणे, ही साधनाच आहे’, हा विचार मनावर बिंबवणे : ईश्‍वरप्राप्‍तीसाठी साधना, तसेच राष्‍ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना साधकांचा होणारा मनाचा त्‍याग हा जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढाच सध्‍याच्‍या सूक्ष्मातील आपत्‍काळात वाईट शक्‍तींचे त्रास धीरोदात्तपणे सोसतांना साधकांचा होणारा मनाचा त्‍याग हाही महत्त्वाचा असतो. असे त्रास भोगणार्‍या साधकांच्‍या या त्‍यागाचे फळ देव त्‍यांना देतच आहे; पण सध्‍या त्रासाशी लढण्‍यात त्‍यांची साधना व्‍यय होत असल्‍याने ते फळ दृष्‍टीगोचर (प्रत्‍यक्ष दिसत) नाही. पुढे त्रास भोगून संपल्‍यावर अशा साधकांची प्रगती त्‍यांच्‍या साधनेच्‍या प्रमाणात वेगाने होईल, याची साधकांनी निश्‍चिती बाळगावी. यासाठी श्री साईबाबांचे हे वचन पुन:पुन्‍हा आठवावे – ‘श्रद्धा और सबुरी ।’

६ आ २. ‘त्रास भोगणे, ही साधनेतील परीक्षा आहे’, असे समजणे : साधनापथावरून वाटचाल करत असतांना देवसाधकांची परीक्षा घेत असतो. हिरण्‍यकश्‍यपूने भक्‍त प्रल्‍हादाचा अतोनात छळ केला, तरी प्रल्‍हाद कधीही डगमगला नाही. भक्‍तीच्‍या बळावर तो प्रत्‍येक संकटातून तरला. देवाने त्‍याची जणू परीक्षाच घेतली होती ! सर्व स्‍थिती अनुकूल असतांना साधना कुणीही करील; पण ‘प्रतिकूल स्‍थिती असतांना साधना करणे’, ही खरी साधना आहे. सध्‍या होत असलेल्‍या त्रासांविषयी साधकांनी ‘देव यातही आपली परीक्षाच घेत आहे; कारण देवाला आपल्‍याला सर्व सुख-दुःखांच्‍या पलीकडे न्‍यायचे आहे’, असा दृष्‍टीकोन ठेवला, तर त्‍यांना त्रासांकडे सकारात्‍मकतेने पहायला जमेल. यासाठी प.पू. भक्‍तराज महाराज यांची ही भजनपंक्‍ती पुन:पुन्‍हा आठवावी –

होई जरी दुःख या जिवा ।
देई परि शक्‍ती शमनाची ॥

६ आ ३. त्रासांमुळे संघर्षाचे बळ अंगी येणे : ‘आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी जो मनाचा संघर्ष सध्‍या साधकांना करावा लागत आहे, तो करण्‍यास साधक शिकले, तर पुढे जीवनात येणार्‍या कोणत्‍याही संघर्षात साधकांना विजयी होता येईल’, याची निश्‍चिती साधकांनी बाळगावी. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची शरणागतीने आळवणी केली, तर हे संघर्षाचे बळही साधकांच्‍या अंगी येईल.’

६ आ ४. ‘साधना करणे’ हे जसे कर्तव्‍य आहे, तसेच ‘हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी त्रास भोगणे’, हेही कर्तव्‍यच आहे !

अ. सध्‍या सनातनचे अनेक साधक सूक्ष्मातील समष्‍टी आध्‍यात्मिक त्रास भोगत आहेत. हा सर्वांगसुंदर आणि आदर्श अशा हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेसाठीच्‍या लढ्याचाच एक भाग आहे. स्‍वातंत्र्यपूर्व काळात स्‍वा. सावरकर आणि अनेक देशभक्‍त यांनी बैलासारखे तेलाचा घाणा फिरवणे, घंटोन्‌घंटे दोन्‍ही हात वर हातकडीत टांगलेल्‍या स्‍थितीत उभे रहाणे यांसारख्‍या हालअपेष्‍टा सहन करण्‍याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. त्‍यांनी स्‍वातंत्र्यासाठी एवढे सोसले, तर आपण धर्मासाठी आणि हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेसाठी त्‍यांच्‍या तुलनेत अगदीच नगण्‍य असलेल्‍या हालअपेष्‍टा ‘साधना’ म्‍हणून का सोसू शकत नाही ?

६ आ ५. त्रासांसमोर हार न पत्‍करता हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे ध्‍येय सतत डोळ्‍यांसमोर ठेवणे : ‘वर्ष २०१५ मध्‍ये एकदा विविध त्रासांमुळे मी अत्‍यंत पिचून गेलेलो असतांना २ – ३ वेळा माझ्‍या मनात विचार येऊन गेला, ‘हे शरीर त्‍यागता आलं तर बरं होईल; कारण सूक्ष्मातून साधना करता येईल.’ एकदा मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांकडे गेलो असतांना ते अचानक मला म्‍हणाले, ‘‘सध्‍या मला एवढे शारीरिक त्रास भोगावे लागत आहेत. खरं पहाता मी कधीच वर निघूनही गेलो असतो; पण ‘हिंदु राष्‍ट्र-स्‍थापना’ अजून बाकी आहे; म्‍हणून थांबलो आहे.’’ ‘केवळ हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेसाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टर समष्‍टी आध्‍यात्मिक त्रासांचा एवढा तळतळाट सहन करत आहेत आणि त्‍या तुलनेत माझे त्रास काहीच नाहीत’, या विचाराने मला माझ्‍या चुकीच्‍या विचारप्रक्रियेची जाणीव झाली. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळे तसा चुकीचा विचार पुन्‍हा माझ्‍या मनात कधी आला नाही.’

– (पू.) श्री. संदीप आळशी

६ आ ६. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे उज्‍ज्‍वल भवितव्‍य समोर दिसत असतांना त्रासांची खंत कशाला बाळगायची ? : ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापन होईल, त्‍यानंतर साधकांचे आध्‍यात्मिक त्रास शीघ्रतेने अल्‍प होतील आणि साधकांची आध्‍यात्मिक प्रगतीही भरभर होईल’, याची परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी निश्‍चिती दिलेली आहे ! यासाठी त्रास असणार्‍या साधकांनी सध्‍याचे त्रासांचे कंटाळवाणे दिवस कंटाळा न करता आनंदाने भोगले पाहिजेत.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१९.९.२०१७)                                      

(क्रमशः) 

(वाचा : सनातनचा लघुग्रंथ ‘आध्‍यात्मिक त्रासांवर मात करण्‍यासाठी उपयुक्‍त दृष्‍टीकोन’)                              

सनातनचे ग्रंथ आणि उत्‍पादने यांच्‍या ऑनलाईन खरेदीसाठी – http://SanatanShop.com

संपर्क क्र. : ९३२२३ १५३१७

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/822237.html