(म्हणे) ‘आम्ही भारताला यासाठी क्षमा करू शकत नाही !’ – बांगलादेशाचे नोबेल पुरस्कारप्राप्त महंमद युनूस
बांगलादेशाचे नोबेल पुरस्कारप्राप्त महंमद युनूस यांची देशातील हिंसाचारावरून साहाय्य न केल्याने भारतावर टीका
नवी देहली – आरक्षणावरूनच भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशामध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे. येथील हिंसाचारात आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशामधील या सर्व घडामोडींविषयी भारत सरकारने ‘हे बांगलादेशाचे अंतर्गत सूत्र आहे’, अशी भूमिका घोषित केली. त्यावरून बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक असणारे नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांनी भारतातील एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, जर माझ्या भावाच्या घरात आग लागली असेल, तर मी ‘ते त्याचे अंतर्गत सूत्र आहे’, असे कसे म्हणू शकतो ? राजनैतिक भाषेत ‘अंतर्गत सूत्र’ यापेक्षाही अनेक योग्य शब्द आहेत. आम्ही भारताला यासाठी क्षमा करू शकत नाही.
महंमद युनूस यांनी मांडलेली सूत्रे
१. (म्हणे) ‘मला प्रचंड वेदना झाल्या !’
‘सार्क’च्या (दक्षिण आशियातील देशांची संघटना) स्वप्नावर माझा विश्वास होता. सर्व सदस्य राष्ट्रांशी युरोपियन युनियनप्रमाणे (युरोपातील देशांची संघटना) एखाद्या कुटुंबासारखे संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे जेव्हा भारताने सांगितले की, हे आमचे (बांगलादेशाचे) अंतर्गत सूत्र आहे, तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या.
२. हे लोण शेजारी राष्ट्रांमध्येही पसरेल !
जर बांगलादेशामध्ये काहीतरी घडत आहे, तर १७ कोटी लोक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तरुणांची सरकारी गोळ्यांनी हत्या होत आहे, कायदा-सुव्यवस्था अदृश्य झाली आहे, तर ‘हे लोण शेजारी राष्ट्रांमध्येही पसरेल’, हे सांगायला कोणत्याही तज्ञाची आवश्यकता नाही.
३. पलायन करणारे तरुण सीमेपलीकडे मोठे आव्हान निर्माण करू शकतात !
हे तरुण त्यांच्या सुरक्षेसाठी शेजारी देशांत पलायन करतात. आपण आगीशी खेळत आहोत. हे बांगलादेशापुरतेच सीमित रहाणार नाही. जर परिस्थिती कायम राहिली, तर लोक सीमेपलीकडे जातील. शांततेच्या काळात स्थलांतरितांना सहन केले जाऊ शकते; पण अशा तणावपूर्ण वातावरणात हे तरुण सीमेपलीकडे मोठे आव्हान निर्माण करू शकतात.
४. भारताने बांगलादेशामध्ये पारदर्शी निवडणुका होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे !
भारताने बांगलादेशामध्ये पारदर्शी निवडणुका होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. तशा त्या झाल्या नाहीत, तर त्याचा निषेधही करायला हवा. भारतात नियमित अंतराने निवडणुका होतात. त्यांचे यश हे दाखवून देते की, आम्ही किती अपयशी आहोत. आम्हाला हे यश साध्य करण्यासाठी राजनैतिक मार्गांनी प्रोत्साहन न देणे हा भारताचा दोष आहे. हे पाहून आम्हाला वेदना होतात. आम्ही भारताला यासाठी क्षमा करणार नाही.
संपादकीय भूमिका
|