Bangladesh PM Resigns : बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन देश सोडला !

  • शेख हसीना भारतमार्गे लंडनला मार्गस्थ

  • बांगलादेशाचे सैन्य अंतरिम सरकार स्थापन करणार

  • हिंसाचारी आंदोलकांची पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून लुटमार !

  • शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा तोडला !

शेख हसीना (डावीकडे )

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने ४ ऑगस्टला प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी ५ ऑगस्ट या दिवशी दुपारी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले. त्यांची बहीण रेहाना याही त्यांच्यासोबत आहेत. शेख हसीना बांगलादेशी सैन्याच्या विमानाने भारतमार्गे लंडन (London) येथे जात आहेत. दुसरीकडे शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंसाचारी आंदोलक ढाका येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले आणि त्यांनी तेथे लुटमार चालू केली. हसीना यांचे वडील आणि माजी पंतप्रधान शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोडही करण्यात आली. याच काळात सैन्यदलप्रमुख जनरल वकार-उझ-जमान (Waqar-uz-Zaman)  यांनी देशवासियांना संबोधित करून घटनेची माहिती दिली. तसेच सैन्य अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली. हसीना यांच्या देश सोडून जाण्याविषयी जनरल जमान यांनी काहीही सांगितले नाही.

आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवून घरी परतावे !

जनरल जमान म्हणाले की, देशात संचारबंदी किंवा आणीबाणी लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आम्ही आज (५ ऑगस्ट) रात्रीपर्यंत तोडगा काढू. बांगलादेशामध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सैन्य अंतरिम सरकार स्थापन करेल. देशभरात उसळलेल्या हिंसाचाराचे पूर्ण दायित्व सैन्यदलप्रमुख म्हणून मी घेतो. माझे आंदोलकांना आवाहन आहे की, त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे. देशभरात गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या हत्यांची सैन्य स्वत: चौकशी करेल. आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवून घरी परतावे, असे त्यांनी आवाहन केले.

बांगलादेश सीमेवर भारतीय सैन्य सतर्क

बांगलादेशातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाला सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सीमेवरून भारतात मोठ्या संख्येने निर्वासित येण्याची शक्यता असल्याचेही म्हटले जात आहे. यापूर्वी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशा निर्वासितांचे स्वागत आहे, असे म्हटले होते. त्याचा तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोध केला होता.


काय आहे प्रकरण ?

बांगलादेशामध्ये सरकारी नोकर्‍यांमध्ये वर्ष १९७१ च्या युद्धातील वीरांच्या नातेवाइकांना ३० टक्के आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय शेख हसीना सरकारने घेतला होता. त्याला तरुणांकडून मोठा विरोध होऊ लागला. तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. महिन्याभरापूर्वी झालेल्या या निदर्शनांमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यावर न्यायालयाने आरक्षण ३० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणले. त्यातील केवळ ३ टक्के वीरांच्या नातेवाइकांना आरक्षित ठेवण्याचा निकाल दिला. त्यानंतर पोलीस, तसेच सरकारी सुरक्षादल यांच्याकडून करण्यात आलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून निषेध मोर्चे काढण्यात आले. यातून ४ ऑगस्टला पुन्हा हिंसाचार होऊन १०० हून अधिक जण मृत्यूमुखी पडले. या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून देशभर अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू केलेली असतांना दुसरीकडे संतप्त जमावाने निषेध मोर्चांचे आयोजन केले. जमावाकडून सातत्याने शेख हसीना यांच्या त्यागपत्राची मागणी केली जात होती. अंतत: हसीना यांनी त्यागपत्र दिले आणि देशातून पलायन केले.

संपादकीय भूमिका

भारताच्या शेजारी असणार्‍या पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेश येथील अस्थिर राजकीय स्थिती पहाता भारताला अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.