वर्ष २०२३ मध्ये २ लाख १६ सहस्र भारतियांनी नागरिकत्व सोडले ! – परराष्ट्र मंत्रालय
नवी देहली – भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात जाणार्या भारतियांच्या संख्येने वाढ होत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसेभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या प्रश्नावरील उत्तरात दिली. या सर्वांनी वैयक्तिक कारणाने नागरिकत्व सोडल्याचे सांगितले जात आहे.
वर्ष २०१९ मध्ये १ लाख ४४ सहस्र १७ भारतियांनी नागरिकत्व सोडले, तर वर्ष २०२० मध्ये ८५ सहस्र २५६ लोकांनी, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ६३ सहस्र ३७०, वर्ष २०२२ मध्ये २ लाख २५ सहस्र ६२० आणि वर्ष २०२३ मध्ये २ लाख १६ सहस्र लोकांनी नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला.
भारतियांचे अमेरिकेला प्राधान्य
वर्ष २०१८ ते २०२३ च्या मध्यापर्यंत भारतातून ३ लाख २८ सहस्र ६१९ भारतियांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. तसेच १ लाख ६१ सहस्र ९१७ जणांनी कॅनडा आणि १ लाख ३१ सहस्र ८८३ जणांनी ऑस्ट्रेलिया देशांचे नागरिकत्व घेतले आहे.