पुणे येथे ‘हनीट्रॅप’च्या टोळीमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग !
गुन्हा नोंद होताच पोलीस उपनिरीक्षक पसार
पुणे – मोहजालात (हनीट्रॅप) अडकवून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्या टोळीत पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच उभे पसार झाले आहेत. या प्रकरणी अवंतिका सोनवणे, पूनम पाटील, आरती गायकवाड यांनाही अटक करण्यात आली आहे.
कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला मोहजालात अडकवून एका महिलेने एका उपाहारगृहात नेले. त्यानंतर स्वत: पोलीस आणि महिला हक्क आयोगाची सदस्य असल्याचे सांगून मारहाण केली. संबंधित नागरिकावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची भीती दाखवून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच त्यांच्याकडील २० सहस्र रुपये आणि भ्रमणभाष काढून घेतला. ही घटना २९ जुलै या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील एका उपाहारगृहामध्ये घडली.
संपादकीय भूमिका :गुन्ह्यांत सहभागी असलेले असे पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? अशा पोलिसांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |