दुचाकीचा अपघात आणि वाईट शक्तींचे आक्रमण यांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे रक्षण झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !
१. दुचाकीवरून सेवेला जात असतांना अपघात होऊन खाली पडणे आणि ‘कुणीतरी डोके धरून आपटत आहे’, असे जाणवणे
‘१७.६.२०२४ या दिवशी पनवेल येथे सेवेला जात असतांना मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, ग्रंथ माझ्या समवेत घेतला आणि दुचाकीवरून सेवेसाठी निघाले. मी एका ठिकाणी संपर्क करून एक विज्ञापन घेतले. त्यानंतर मी देवद आश्रमात परत येण्यासाठी निघाले. मी दुचाकी चालवत असतांना पनवेल येथे रस्त्याच्या गटारावर ठेवलेल्या सिमेंटच्या चौकोनी झाकणावर माझी दुचाकी आदळली. माझ्या दुचाकीचे पुढचे चाक झाकणाच्या रिकाम्या जागेत अडकले. त्यामुळे दुचाकीचे पाठीमागचे चाक घसरले आणि मी दुचाकीवरून खाली पडले. मी उठत असतांना ‘माझे डोके कुणीतरी धरले आणि वेगाने अन् बलपूर्वक सिमेंटचे चौकोनी झाकण ठेवलेल्या लोखंडी फ्रेमच्या कडेवर आपटले’, असे मला जाणवले. मला त्याचा मोठा आवाज ऐकू आला. तेव्हा क्षणभर माझ्या मनात विचार आला, ‘माझ्यावर वाईट शक्तीचे आक्रमण झाले आहे. आता माझ्या डोक्याचे काय होणार ? ’
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ समवेत असल्याने अपघातातून रक्षण झाल्याचे जाणवणे
माझा अपघात झाल्यावर मला उठता येत नव्हते. माझ्या भुवईच्या वर जखम झाली होती आणि तिच्यातून रक्त येत होते. तेथेच बाजूला असलेले रिक्शाचालक लगेचच धावून आले. त्यांनी माझी दुचाकी उचलली. त्यांनी मला लगेच रिक्शात बसवून जवळच्या चिकित्सालयात नेले. ते माझ्या समवेत तेथे बसून राहिले. ते आधुनिक वैद्यांना मला झालेल्या दुखापतीविषयी विचारत होते. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘देवाची कृपा समजा. डोळा वाचला !’’ तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, म्हणजे प्रत्यक्ष गुरुदेवच माझ्या समवेत होते. त्यांनीच मला अपघातातून आणि वाईट शक्तीच्या आक्रमणातून वाचवले’, असे मला जाणवले. त्याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
३. ‘रिक्शाचालकाच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी साहाय्य केले’, असे जाणवून कृतज्ञता व्यक्त होणे
आधुनिक वैद्यांनी मला इंजेक्शन दिले आणि मलमपट्टी (ड्रेसिंग) केली. त्यांचे ३०० रुपये देयक झाले. ते देयक रिक्शाचालक भरत होते. तेव्हा मी त्यांना ‘माझ्याकडे पैसे आहेत’, असे सांगून पैसे भरले. नंतर रिक्शाचालक मला म्हणाले, ‘‘तुम्हाला रिक्शाने घरी सोडायचे का ? तुमची दुचाकी इथेच राहू द्या. कोणी हात लावणार नाही. आमचा रिक्शातळ (रिक्शा स्टँड) येथेच आहे.’’ तेव्हा मी हात जोडून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर मी साधकांच्या साहाय्याने देवद आश्रमात परत आले आणि दुचाकीही आश्रमात आणली. ‘रिक्शाचालकाच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी मला साहाय्य केले’, याची मला जाणीव झाली आणि मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.’
|