हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उरण (रायगड) येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !
धर्मशिक्षण घेण्यासह स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होण्याचा युवतींचा निर्धार !
उरण (रायगड) – सध्या युवती आणि महिला यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचाराचे प्रसंग पहाता त्याला सामोरे जाण्यासाठी बळ वाढणे आवश्यक आहे. उरण येथे घडलेले यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. हे सर्व लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी उरण येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात कराटे, दंडसाखळी प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धती शिकवण्यात आल्या. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी उपस्थित युवतींना मार्गदर्शन केले. युवतींनी धर्मशिक्षण घेण्यासह स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होण्याचा निर्धार केला.
हिंदु युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम व्हावे ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्थाआज स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघितले जाते. परिणामी काही वर्षांपूर्वी परस्त्री मातेसमान अशी ओळख असणार्या भारताची आज जगभरात ‘बलात्कारांचा देश’ म्हणून ओळख निर्माण होत आहे. स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही युवती असुरक्षितच आहेत. बलात्कार, अत्याचार, लैंगिक शोषण आणि लव्ह जिहाद यांसारख्या महाभयंकर षड्यंत्राचा विळखा युवतींच्या असुरक्षिततेमागील मोठे कारण आहे. याविरोधात लढण्यासाठी युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम होणे आवश्यक आहे. |
अभिप्राय
१. अक्षता – अगोदर मला समाजात फिरतांना भीती वाटायची नाही; पण आता उरण येथील यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येच्या प्रसंगानंतर भीती निर्माण झाली होती; पण शिबिराला आल्यावर भीती जाऊन आत्मविश्वास निर्माण झाला.
२. ईशा विमल – माझ्यावर कुणी अन्याय केल्यास मी त्याचा प्रतिकार करू शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला.
३. रीना गोंधळी – हिंदु जनजागृती समिती चांगली कामगिरी करत आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षण हे शाळेमध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवायला हवे.
४. कोमल घरत – आपण जिजाऊंच्या राज्यात वाढलेले आहोत. ही शिकवण मुलींमध्ये जागृत करून त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे.
५. तन्वी कांबळी – हिंदु जनजागृती समिती धर्मासाठी कार्य करत आहे. त्यासाठी तिचे आभार !
क्षणचित्रे
१. युवतींनी वक्त्यांना भेटून हिंदु धर्म आणि धर्मशिक्षण यांविषयी चर्चा केली.
२. काही युवतींनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करून मनातील व्यथा मांडल्या.