नाईट क्लबमुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या ३ वर्षांत दीडशे तक्रारी
तक्रारीनंतर शासनाकडून केवळ नोटिसा पाठवण्याची औपचारिकता; मात्र कारवाई नाही
पणजी – नाईट क्लबद्वारे रात्री अपरात्री पार्ट्यांचे आयोजन करून ध्वनीप्रदूषण करण्याचे प्रकार न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर जरी अल्प झालेले असले, तरीही गेल्या ३ वर्षांत ध्वनीप्रदूषणाच्या १५८ तक्रारी सरकारकडे आलेल्या आहेत. तक्रारींवर कारवाई म्हणजे केवळ नोटिसा पाठवण्याचे काम गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे. विधानसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार वर्ष २०२३ पासून नाईट क्लबचा उपद्रव वाढला आहे. रात्री ध्वनीक्षेपके लावून पार्ट्या होऊ लागल्याने याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या ध्वनीप्रदूषणाविषयी नागरिकांनी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर अधिकारिणी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत यासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी झालेल्या आहेत. तक्रारीनंतर केवळ नोटिसा पाठवल्या जातात; मात्र कारवाई होत नाही. यामुळे ध्वनीप्रदूषण थांबत नाही आणि एखाद्या क्लबच्या विरोधात पुन:पुन्हा तक्रारी केल्या जातात.
ध्वनीप्रदूषणावरून हणजूण ग्रामसभेत ग्रामस्थ संतप्त
म्हापसा, ४ ऑगस्ट (वार्ता.) – हणजूण पंचायतीच्या ४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ग्रामसभेत पंचायत क्षेत्रात होत असलेल्या ध्वनीप्रदूषणावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांना भेडसावणार्या अन्य समस्या उदाहरणार्थ अपुर्या कंदब बससेवा, रस्त्यांची दयनीय स्थिती, पंचायत क्षेत्रात पायाभूत सुविधांचा अभाव असणे आदी समस्या मांडल्या. पंचायत क्षेत्रात गटाराचे पाणी नदी प्रदूषित करत असल्याचे सूत्र ग्रामस्थांनी उपस्थित केले. पंचायत मंडळ ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.