धर्माभिमान्यांचे आदर्श असणारे आणि साधकांमध्ये समष्टी गुणांची वृद्धी करणारे सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (वय ५७ वर्षे)!
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा श्रावण शुक्ल प्रतिपदा म्हणजे ५.८.२०२४ या दिवशी ५७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मथुरा येथील साधक श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे) यांना सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी ५७ व्या वाढदिवसानिमित्त सर्व साधकांकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. अनासक्त : ‘सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांना मायेतील कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही. ते प्रत्येक कृती कर्तव्य म्हणूनच करतात. ते त्यांच्या कुटुंबियांनाही कर्तव्य म्हणून आवश्यक तेवढे साहाय्य करतात.
१ आ. इतरांचा विचार करणे : उन्हाळ्याच्या दिवसात आश्रमात प्रचंड उष्णता असतांना सद़्गुरु काकांनी साधकांसाठी वातानुकूलित यंत्र बसवले; परंतु स्वतःसाठी वातानुकूलित यंत्र मागितले नाही. साधकांना अडचण येऊ नये; म्हणून सेवाकेंद्रात आलेले अतिरिक्त लाकडी साहित्य साधकांच्या खोलीत ठेवण्याऐवजी ते स्वतःच्या खोलीत ठेवण्यास सांगतात. ते स्वतःपेक्षा साधकांचा अधिक विचार करतात.
१ इ. काटकसरीपणा : सद़्गुरु काका स्वतःचे कपडे जीर्ण होईपर्यंत वापरतात. कपडे फाटले असल्यास त्याला ठिगळे लावून वापरतात. ते स्वतःसाठी अनावश्यक कपडे कधीही विकत घेत नाहीत. ते त्यांच्याकडील आणि सेवाकेंद्रातील प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरतात, उदा. खोलीतील वातानुकूलित यंत्र आवश्यक तेवढाच वेळ चालू ठेवणे, विजेचा वापर काटकसरीने करणे इत्यादी.
१ ई. प्रीती : सद़्गुरु काकांचे साधकांवर रात्रंदिवस लक्ष असते. अनेक वेळा ते रात्री जागे राहून साधकांचे शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी प्रार्थना आणि नामजप करत असतात. ते मथुरा सेवाकेंद्रापासून दूर गेले, तरी साधकांची अधूनमधून विचारपूस करून साधकांच्या अडचणी सोडवत असतात. ‘घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’, ही काव्यपंक्ती सद़्गुरु काकांच्या संदर्भात सार्थ आहे. साधकांवर मातृ-पितृवत् प्रेम कसे केले पाहिजे, हे सद़्गुरु काकांकडून शिकायला मिळते.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. अध्यात्मात केवळ बुद्धीने विचार न करता श्रद्धायुक्त किंवा भावयुक्त रहायला शिकवणे : मी उत्तर भारतात सेवेसाठी जाण्यापूर्वी सद़्गुरु काकांनी मला श्रद्धा आणि बुद्धी यांतील भेद शिकवला. त्यांनी मला अध्यात्मात केवळ बुद्धीने विचार न करता श्रद्धायुक्त किंवा भावयुक्त रहायला शिकवले. त्यासाठी त्यांनी ‘गुरूंनी सांगितल्यावर वाळक्या फांदीला प्रतिदिन पाणी घालणार्या शिष्यासारखा भाव असावा’, असे सांगितले.
२ आ. ‘देवाचे साधकाच्या अंतर्मनातील प्रक्रियेकडे लक्ष असते !’, याची जाणीव करून देणे : ते संत झाल्यानंतर देवद, पनवेल येथील आश्रमांतील साधकांसाठी झालेल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले, ‘‘साधक स्थुलातून काय करतो, ते देव पहात नाही. देवाचे साधकाच्या अंतर्मनातील प्रक्रियेकडे लक्ष असते.’’ हे वाक्य माझ्या मनावर कोरले गेले. त्यामुळे ‘अंतर्मन शुद्ध आणि प्रतिक्रियाविरहित आहे ना ?’, याकडे माझे लक्ष राहू लागले.
२ इ. साधकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे : साधनावृद्धीसाठी साधकांचे विविध प्रकारचे सत्संग होतात. ‘त्या वेळी काय शिकायला मिळाले ? साधकांना केलेल्या दिशादर्शनातून साधकांना काय शिकायला मिळाले ? साधकांना साहाय्य कसे करावे ? तत्त्वनिष्ठ राहून साधकांना साधनेत पुढे कसे घेऊन जावे आणि साधकांतील नेतृत्वगुण कसा विकसित करावा ?’, अशा विविध गोष्टी सद़्गुरु काकांनी आम्हाला शिकवल्या.
२ ई. तत्त्वनिष्ठपणे साधकांना चुका सांगणे : सद़्गुरु काका साधकांच्या चुका तत्त्वनिष्ठ राहून सांगतात. चुका सांगितल्यामुळे साधकांचा अहं न्यून होण्यास साहाय्य होते. ते साधकांना त्यांच्या चुका भोजनकक्षात किंवा सर्वांसमोर सांगण्यास सांगतात. त्यामुळे साधकांचा अहं शीघ्र गतीने न्यून होण्यास साहाय्य होते.
२ उ. साधकांना चुकांतून शिकून पालट करण्यास सांगणे : सद़्गुरु काका अनेक वेळा सांगतात, ‘‘साधकांनी चुकांमधून शिकून घेऊन स्वतःमध्ये पालट केले पाहिजेत. साधकाला चुकीची खंत वाटली पाहिजे.’’ एकदा मी बाहेरगावी असतांना माझ्याकडून झालेली एक चूक सद़्गुरु पिंगळेकाकांना कळवली होती. तेव्हा त्यांना आनंद झाला. ‘श्री गुरु भूतकाळात काय घडून गेले, त्याकडे पहात नाहीत, तर वर्तमानात साधक ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे ना ?’ हे पहातात’, असे माझ्या लक्षात आले.
२ ऊ. साधकांना ‘मनाने करणे’ या स्वभावदोषावर मात करण्यास शिकवणे : काही साधक काही वेळा न विचारता स्वतःच्या मनाने सेवा करतात. त्यामुळे गुरुकार्य आणि साधकांची साधना यांची हानी होते. त्यासाठी सद़्गुरु काकांनी साधकांना प्रत्येक गोष्ट विचारून करण्यास सांगितले आहे. त्यांनी साधकांना वैयक्तिकरित्या आणि सत्संगांमध्ये याविषयी प्रेमाने सांगून साधकांच्या मनावर सेवा अन् साधना विचारून करण्याचा संस्कार केला आहे.
२ ए. राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना कार्याशी जोडून ठेवणे : सद़्गुरु काका ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. त्यांचा हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयी सखोल अभ्यास आहे. ते धर्माभिमान्यांशी नम्रतेने आणि प्रेमाने वागतात. त्यामुळे सद़्गुरु काका अनेक धर्माभिमान्यांसाठी आदर्श आहेत. त्यांनी अनेक राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना कार्यामध्ये जोडले आहे.
३. अनुभूती
३ अ. सद़्गुरु पिंगळेकाकांना आत्मनिवेदन केल्यावर त्यांच्यातील चैतन्यामुळे समस्या आपोआप सुटणे : ‘मी माझा आध्यात्मिक त्रास किंवा कौटुंबिक अडचणी सद़्गुरु काकांना सांगतो. मी त्यांना माझी समस्या सांगितली अथवा संदेश पाठवला की, माझी अडचण त्वरित सुटते. काही वेळा नामजपादी उपाय करूनही माझे त्रास न्यून होत नव्हते. त्या वेळी सद़्गुरु काकांच्या खोलीत जाऊन काही सूत्रांच्या संदर्भात बोलणे झाले किंवा सद़्गुरु काकांंनी दिशादर्शन केले की, त्यांच्यातील चैतन्यामुळे माझे आध्यात्मिक त्रास उणावतात.
देवाने मला सद़्गुरु पिंगळेकाकांचा सत्संग देऊन मला शिकण्याची संधी दिली. त्यांच्यामुळे मला साधनेत सतत दिशादर्शन मिळत असते. त्याबद्दल सद़्गुरु पिंगळेकाकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री गुरुचरणसेवक,
श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र (३.७.२०२४)
|