काँग्रेसचे कमलनाथ यांची ‘विश्व आदिवासी दिवसा’निमित्त सुटीची देशद्रोही मागणी !
‘विश्व मूलनिवासी दिवसा’ला ‘आदिवासी दिवस’ साजरा करण्यामागे साम्यवादी षड्यंत्र !
अलीकडे आपल्या देशातही ‘विश्व मूलनिवासी दिवस’ साजरा करण्याची प्रथा (ट्रेंड) चालू झाली आहे. अनेक राज्ये हा ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करतात. छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांसारख्या राज्यांनीही ९ ऑगस्ट ही ‘ऐच्छिक सुटी’ घोषित केली आहे. हे सगळे कसे झाले ? याचे उत्तर आहे, साम्यवादी विचारसरणीच्या रणनीतीमुळे ! आता यात साम्यवादी कुठे आले ? समाजात वर्गसंघर्ष निर्माण करणे आणि प्रस्तावित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष निर्माण करणे, ही साम्यवादी विचारसरणीची मूळ कल्पना आहे. या संघर्षामुळे अराजकता निर्माण होईल आणि अराजकतेमध्येच क्रांतीची बीजे दडलेली आहेत. त्यामुळे यातून सर्वंकष क्रांती होईल! म्हणजेच ‘मूलनिवासी दिवस’ हे वर्गसंघर्षाचे उत्तम साधन आहे. याचा पुरेपूर लाभ साम्यवादी विचारवंतांनी घेतला.
संयुक्त राष्ट्र्रांनी ‘विश्व मूलनिवासी दिवस’ घोषित केल्यानंतर ‘आदिवासी हे या देशाचे खरे (मूळ) नागरिक असून अन्य बाहेरून आलेले आहेत’, अशी चर्चा आपल्या देशात चालू झाली. ‘आर्य बाहेरून आले आहेत’, हा सिद्धांत आधीच प्रस्थापित झाला होता, जो शाळांमध्येही शिकवला जात होता. हा सिद्धांत ब्रिटिशांनी निर्माण केला. त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांमध्ये जाऊन तेथील मूळ रहिवाशांना हाकलून किंवा मारून त्यांचे साम्राज्य प्रस्थापित केले. ‘भारतातही सर्वजण बाहेरूनच आले आहेत. त्यामुळे इंग्रजांच्या आगमनाने काही फरक पडत नाही’, हा त्या सिद्धांताचा आधार होता.
असे असले, तरी स्वातंत्र्यानंतरही आपल्या साम्यवादी विचारवंतांनी असा वाद निर्माण करणे, हे या देशाचे दुर्दैव आहे. आजपासून १३ वर्षांपूर्वी, म्हणजे १२ जानेवारी २०११ या दिवशी ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रात ‘इंडिया लार्जली अ कंन्ट्री ऑफ इमिग्रंट्स’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ‘जर उत्तर अमेरिका प्रामुख्याने नवीन स्थलांतरितांनी बनलेली असेल, तर भारत हा मुख्यत: जुन्या स्थलांतरितांचा देश आहे’ (If North America is predominantly made up of new immigrants, India is largely a country of old immigrants.), असे म्हटले आहे. या लेखात ‘या देशाचे (उत्तर अमेरिकेचे) मूळ रहिवासी तर केवळ ८ टक्के आदिवासीच आहेत आणि उर्वरित ९२ टक्के लोक बाहेरून आले आहेत’, असे ठामपणे नमूद केले आहे. ‘या तथ्यामुळे भारतात रहाणारे सुमारे ९२ टक्के लोक स्थलांतरितांचे वंशज आहेत.’ (These facts lend support to the view that about 92 percent of the people living in India descendants of immigrants.) ब्रिटिशांनी लिहिलेल्या ‘द केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया (भाग-१)’मधील संदर्भ वरील लेखासाठी घेण्यात आला आहे. यापेक्षा मोठे व्यंग काय असू शकते ? असे अनेक लेख गेल्या काही वर्षांत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ‘आर्य बाहेरून आले’, ही चर्चा आता चुकीची सिद्ध झाली आहे. आपण सर्व या भारत देशाचे मूळ रहिवासी आहोत. याउलट ‘आऊट ऑफ इंडिया थेअरी’चे (भारताबाहेरील सिद्धांत) महत्त्व वाढत आहे. या सिद्धांतानुसार भारतासारख्या समृद्ध देशातून काही समाज भारताबाहेर स्थलांतरित झाले आहेत. सेल्टिक आणि येझिदी समुदाय ही याची उदाहरणे आहेत. कोनराड ईस्टसारख्या विचारवंतांनी ते मांडले आहे.
– लेखक : श्री. प्रशांत पोळ
१. भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणार्या देशविरोधी शक्तींच्या हातचे बाहुले म्हणजे कमलनाथ !
‘मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी विद्यमान मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी ‘विश्व आदिवासी दिवसा’निमित्त मध्यप्रदेशमध्ये ९ ऑगस्ट या दिवशी सुटी घोषित करावी’, अशी मागणी केली. हे पत्र कमलनाथ देश तोडण्याचा प्रयत्न करणार्या शक्तींच्या हातात खेळत असल्याचा पुरावा आहे. पहिली गोष्ट अशी की, ९ ऑगस्ट हा दिवस जगात ‘विश्व आदिवासी दिवस’ म्हणून नाही, तर ‘विश्व मूलनिवासी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दोघांमध्ये बरेच भेद आहेत.‘विश्व मूलनिवासी दिवसा’शी भारताचा काहीही संबंध नाही. इस्लामी आक्रमकांखेरीज भारतात कुणीही बाहेरून आलेले नाही. भारत तोडण्याचा प्रयत्न करणार्या शक्तींना भारत हाही स्थलांतरितांचा किंवा बाहेरून आलेल्या लोकांचा देश असल्याचे दर्शवायचे आहे. कमलनाथ यांच्यासारखे लोक अशा देशविरोधी शक्तींच्या हातचे बाहुले बनले आहेत.
२. ‘विश्व मूलनिवासी दिवस’ साजरा करण्यामागील संयुक्त राष्ट्रांची भूमिका
वर्ष १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ‘विश्व मूलनिवासी दिवस’ घोषित केला होता. ९ ऑगस्ट १९८२ या दिवशी ‘वर्किंग ग्रुप ऑन इंडिजिनस पीपल्स’ (मूलनिवासी लोकांच्या समूहावर कार्यरत गट) या समूहाची पहिली बैठक झाली. त्यामुळे तो दिवस ‘विश्व मूलनिवासी दिवस’ साजरा केला जातो. यामागे संयुक्त राष्ट्रांची भूमिका अगदी स्पष्ट आहे. त्यांच्या मतानुसार जगातील अनुमाने ९० देशांमध्ये ४७ कोटी ६० लाख स्थानिक लोक रहातात, तसेच जगातील गरीब लोकांपैकी १५ टक्के स्थानिक लोक आहेत. अशा स्थानिक लोकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
३. अमेरिकेतील मूळ निवासींना पडले ‘रेड इंडियन’ नाव !
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, वर्ष १४९२ मध्ये भारतात पोचण्याच्या प्रयत्नात कोलंबस अमेरिकेत पोचला. तिथे गेल्यावर त्याला वाटले की, हा ‘इंडिया’ आहे. त्यामुळे तिथे आधीपासून रहाणार्या लोकांना ‘इंडियन’ असे नाव देण्यात आले. नंतर तो भाग ‘इंडिया’ नसल्याचे कोलंबसच्या लक्षात आले आणि त्याचा अपसमज दूर झाला; पण त्यानंतरही त्या ठिकाणच्या मूळ रहिवाशांना दिलेले ‘इंडियन’ हे नाव तसेच राहिले. पूर्वी त्यांना ‘रेड इंडियन’ म्हटले जायचे. आज त्यांना ‘अमेरिकी इंडियन’ (मूळ अमेरिकी) म्हटले जाते.
४. अमेरिकेतील ‘रेड इंडियन्स’चा नरसंहार
वर्ष १४९२ मध्ये जेव्हा कोलंबससह काही युरोपीय लोक तेथे प्रथम आले होते, तेव्हा हेन्री डॉबिन्सच्या मते तेथील मूळ रहिवाशांची संख्या, म्हणजे अमेरिकी इंडियन्सची लोकसंख्या १ कोटी ८० लाख होती. लोकसंख्या वाढीच्या गुणोत्तरानुसार आज ही संख्या १५ कोटींच्या आसपास असायला हवी होती; पण गेल्या ४००-५०० वर्षांत अमेरिकेत स्थायिक झालेल्या इंग्रज, फ्रेंच, स्पॅनिश इत्यादी युरोपीय लोकांनी या स्थानिकांवर प्रचंड अत्याचार केले आणि त्यांचा नरसंहार केला. या ‘इंडियन्स’मध्ये अनेक संक्रमित होणारे आजार पसरवण्यात आले. त्यामुळे रेड इंडियन मोठ्या संख्येने मरण पावले. या सर्वांमुळे वर्ष २०१० च्या अमेरिकेच्या जनगणनेनुसार या मूळ लोकांची संख्या ५५ लाख आहे की, जी अमेरिकी लोकसंख्येच्या केवळ १.६७ टक्के आहे.
५. ऑस्ट्रेलियातही मूळ निवासींचा वंशविच्छेद
वर्ष १७७० मध्ये ब्रिटीश सैन्याचा लेफ्टनंट जेम्स कुक पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला पोचला. त्या वेळी ब्रिटीश सरकार त्यांच्या कैद्यांना ठेवण्यासाठी मोठे बेट शोधत होते. जेम्स कुक आणि त्याचा सहकारी जोसेफ बँक्स यांच्या सांगण्यावरून ब्रिटीश सरकारने ऑस्ट्रेलियाचे बेट त्यासाठी निश्चित केले होते. १३ मे १७८७ यादिवशी ११ जहाजांमध्ये भरलेले दीड सहस्रांहून अधिक इंग्रज या बेटावर पोचले. त्यापैकी ७३७ कैदी होते. ऑस्ट्रेलियातील वसाहतवादाचा हा प्रारंभ होता.
त्या वेळी ऑस्ट्रेलियात रहाणारे मूळ लोक २ मोठ्या गटांमध्ये विभागले होते. या ब्रिटिशांनी त्यांची ‘टोरस स्टे्रट आईसलँडर्स’ आणि ‘अबओरिजिनल’, अशी नावेही ठेवली होती. त्या काळात दोन्ही गटांची एकूण लोकसंख्या १० लाखांहून अधिक होती. लोकसंख्या वाढीच्या गुणोत्तरानुसार आज ती ६० लाखांहून अधिक अपेक्षित होती; पण २०१६ च्या जनगणनेनुसार ती केवळ ७ लाख ९० सहस्र आहे, जी ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येच्या ३.३ टक्के आहे. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची संख्या इतकी न्यून कशी झाली ? मूळ रहिवाशांचा क्रूरपणे नरसंहार करण्यात आला, तसेच विदेशातून आलेल्या विविध आजारांमुळे त्यांचे नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दिसते.
६. मूळ रहिवाशांना (अमेरिकी इंडियन्सना) नागरिक बनवण्याचे अमेरिकेचे धोरण
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांमधील मूळ रहिवाशांची स्थिती अत्यंत वाईट होती. युरोपीय लोकांनी त्यांची स्थिती अत्यंत वाईट करून टाकली होती. अमेरिकेने त्यांना नागरिक बनवायचे ठरवले. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळापासून या मूळ रहिवाशांचे म्हणजेच ‘अमेरिकी इंडियन्स’ यांना ‘नागरिक’ बनवण्याचे धोरण आजतागायत चालू आहे. या सर्व स्थानिकांना अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी मुळापासून उपटून टाकले आहे. ते कुठेच शिल्लक राहिले नाहीत. अनेक मूळ अमेरिकी आज दारिद्य्र रेषेखाली आहेत.
७. भारतातील सर्व नागरिक मूलरहिवासी !
भारतात आपण सर्व मूल रहिवासी आहोत. अशा परिस्थितीत येथे ‘विश्व मूलनिवासी दिवस’ साजरा करण्याचे औचित्य काय आहे ? निश्चितपणे मुसलमान आक्रमणकर्ते बाहेरून आले होते. ते इराण (पर्शिया), इराक, अफगाणिस्तान, तुर्कीये, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान इत्यादी अनेक देशांमधून आले होते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येनुसार पाहिल्यास हे आक्रमणकर्ते वगळता भारतातील प्रत्येक जण मूळ रहिवासी आहेत. बाहेरून आलेले इंग्रजही होते; पण स्वातंत्र्यानंतर (वर्ष १९४७ नंतर) त्यांनी भारत सोडला. मग भारतात या ‘विश्व मूलनिवासी दिवसा’चे कोणतेही औचित्य नसावे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतील आदिवासींच्या हक्कांसाठी मर्यादित सहानुभूती अन् समर्थन देणे, एवढीच मर्यादित आपली भूमिका असायला हवी होती; पण असे झाले नाही.
८. मूळ निवासींच्या संदर्भात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी भारताची तुलना करणे अयोग्य !
अनुमाने ५०० ते १ सहस्र वर्षांपासून ज्या देशांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी सत्ता आणि राज्यकारभार मिळवला, त्या देशांतील मूळ रहिवाशांना संयुक्त राष्ट्र्रे ‘मूळ रहिवासी’चा दर्जा देत आहे. आपल्या देशात वेद, उपनिषदे आणि पुराण सहस्रो वर्षे प्राचीन आहेत. सर्व उदाहरणे, सर्व पुरावे, सर्व तथ्ये आपल्याला किमान ७-८ सहस्र वर्षांच्या इतिहासात घेऊन जातात. याचा अर्थ मुसलमान आक्रमकांचा अपवाद वगळता आपण सर्व मूळ रहिवासी आहोत आणि ज्यांना ‘आदिवासी’ म्हणतात, ते ‘आदिम युगात’ रहाणारे आदिवासी नसून जंगलात अन् खेड्यात रहाणारे ‘वनवासी’ आहेत. हा पुष्कळ प्रगत आणि प्रगल्भ समाज आहे. त्यांची पाण्याची व्यवस्था, त्यांचे सामाजिक जीवन, त्यांचे पर्यावरणासह रहाणे, असे सर्वच आश्चर्यकारक आहे. अनुमाने ५०० वर्षांपूर्वी आपल्या गोंडवानाची वनवासी राणी दुर्गावती बंदूक वापरण्यात निपुण होती. असा समाज वंचित आणि शोषित कसा असू शकतो ? त्यामुळे मूळ निवासींच्या संदर्भात भारताची अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांशी तुलना करणे, हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. एका सखोल षड्यंत्राखाली भारतात ‘मूलनिवासी दिवसा’ला ‘आदिवासी दिवस’ करण्यात आला आहे. देशाच्या एकात्मतेला तडा देणारे हे कृत्य असून ते पूर्ण शक्तीनिशी थांबवले पाहिजे. भारतात आपण सर्व मूलनिवासी आहोत, हेच सत्य आहे आणि हाच भाव असला पाहिजे !’ (२६.७.२०२४)
– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक अन् अभियंता, जबलपूर, मध्यप्रदेश.