Canada Rahat Rao :  कॅनडात खलिस्तानी चळवळीत सक्रीय असलेल्या पाकिस्तानी उद्योजकाला अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न !

उद्योजक पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असल्याचा संशय

राहत राव

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या मृत्यूनंतर खलिस्तानी चळवळीत सक्रीय सहभागी असलेल्या राहत राव नावाच्या पाकिस्तानी उद्योजकाला कॅनडात जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. अज्ञात आक्रमणकर्त्याने हे कृत्य केले.

ब्रिटीश कोलंबिया प्रांतात राहत राव याचा ‘फॉरेक्स’चा (विदेशी मुद्रेचा) व्यवसाय आहे. राहत राव हा गंभीररित्या घायाळ झाला आहे. खलिस्तानी चळवळीमध्ये त्याचा मोठा हात आहे. निज्जरच्या हत्येनंतर कॅनडात झालेल्या अनेक आंदोलनांत राव याचा सक्रीय सहभाग होता. राव हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’चा हस्तक असल्याचे बोलले जात आहे.


खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याची गेल्या वर्षी जूनमध्ये ब्रिटीश कोलंबियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येमागे भारताचाच हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेनेही आणखी एक खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कटावरून भारतीय अधिकार्‍याला पकडल्याचा दावा केला होता.