खड्ड्यांची दुनिया !
मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांना नागरिक पुरते वैतागले आहेत. काही ठिकाणी पावसामुळे हे खड्डे वाढले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांतील आधीपासून असलेल्या खड्ड्यांत पाणी साठले आहे. ‘आरे कॉलनी’तून दादर येथे जाण्यासाठी दुप्पट वेळ लागत आहे. जलद प्रवासासाठी बांधलेल्या अटलसेतूला जोडलेल्या रस्त्यांवरून तिथे जाण्यास मात्र खड्ड्यांमुळे वेळ लागत आहे. नाशिक ते मुंबई हा रस्त्याचा ३ घंट्यांचा प्रवास खड्ड्यांमुळे ६ घंट्यांचा झाला आहे. जुलै २०२४ मध्ये ठाण्यात घोडबंदर येथील रस्त्याचे काम करण्यात आले, त्या रस्त्यावरही पुन्हा लगेचच खड्डे पडलेले दिसून येत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग काही ठिकाणी सिद्ध झाला असला, तरी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने प्रवास कठीण झाला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोकांचे पाठीचे दुखणे आणि वैद्यांची देयके मात्र वाढत आहेत. अपघातांचे प्रमाण वाढून त्यात अनेकांना जीवही गमवावा लागत आहे. त्याची आकडेवारी मोठी आहे. नागरिक कर आणि पथकर भरतात; मात्र चांगले रस्ते काही अद्याप मिळत नाहीत. वाहतूककोंडी वाढून प्रवासाचा वेळ वाढल्याने अनेकांना कुटुंबालाही वेळ देता येत नाही. घरातून लवकर निघावे लागते आणि विलंबाने घरी पोचतात. या कारणामुळे नागरिकांचे मानसिक त्रासही वाढले आहेत. त्यामुळे एकप्रकारे संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होत आहे.
अनेक ठिकाणी नागरिक या खड्ड्यांच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. महागड्या गाडीतून प्रवास करणारी व्यक्ती असो, बस किंवा रिक्शा यांसारख्या सार्वजनिक वाहनातून जाणारी व्यक्ती असो किंवा सायकलवरून अथवा पायी जाणारा सर्वसामान्य नागरिक सर्वच जण या खड्डेयुक्त रस्त्यांना आता कंटाळले आहेत. प्रशासन आणि शासन यांचे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे होणारे दुर्लक्ष हे नागरिकांच्या जिवावर बेतणारे ठरते, तरीही यावर ठोस सार्वत्रिक उपाययोजना का निघत नाही ? महायुतीचे सरकार आल्यावर प्रशासनाकडून ‘मुंबई खड्डेमुक्त होणार’, अशी घोषणा झाली होती. ती किती प्रमाणात कार्यवाहीत आली ? याचा आढावा कळू शकला नाही. नुकतेच एका वृत्त वाहिनीवर दाखवण्यात आले की, खड्ड्यात पाणी भरलेले असतांनाच वरून सिमेंट टाकले जात आहे. अशा प्रकारे खड्डे बुजवले, तर ते किती दिवस टिकणार ? एक वृत्त असेही दाखवण्यात आले की, रस्त्यावरील डांबराचा थरच्या थरच पापडासारखा निघून आला आहे. मुंबई-कोकण महामार्गावर जिथे गावे लागतात, तेवढ्या भागाचे काँक्रिटीकरण करायचे तसेच ठेवले जाते, असे लक्षात येते. यामागे ‘आर्थिक’ कि ‘तांत्रिक’ गणित नेमके काय आहे ?, याचे कोडे सामान्यांना उलगडत नाही. असो. ही ‘खड्ड्यांची दुनिया’ शासनकर्त्यांच्या विकासवादाला मात्र खड्ड्यात घालत आहे !
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.