संपादकीय : द्रमुकचा पुन्हा एकदा श्रीरामद्वेष !
द्रमुक म्हणजेच द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे मंत्री एस्.एस्. शिवशंकर यांनी ‘प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा नाही !’, असे सांगून पुन्हा एकदा श्रीरामाविषयीचा द्वेष प्रकट केला आहे. ज्या तमिळनाडूमध्ये श्रीरामाच्या नावाने ‘रामेश्वरम्’ असे ठिकाण आहे, जगप्रसिद्ध रामसेतू अस्तित्वात आहे, तसेच श्रीरामाने भेट दिलेली ठिकाणे आहेत, त्याच तमिळनाडूतील सत्ताधारी पक्षाचा मंत्री ‘श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा नाही, असे सांगतो’, हा वेडेपणा नसून ठरवून केलेली विधाने आहेत. बौद्ध बहुसंख्य असलेली श्रीलंकाही रामसेतू मान्य करते. त्यांच्या प्रदेशात असलेली रामाने भेट दिलेली, सीतामाता राहिलेली, तसेच रावणाशी संबंधित स्थाने जतन करण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे, याउलट भारतातील तमिळनाडूतूनच केवळ एका पक्षाचा विरोध होत आहे. स्वत: ‘इस्रो’ ही भारतातील जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था रामसेतूची खोली, लांबी यांविषयी व्यापक संशोधन करणार आहे. त्यासाठी त्यांना ‘नासा’ ही अमेरिकेची प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था साहाय्य करणार आहे.
श्रीरामाने वानरांकडून बांधून घेतलेल्या रामसेतूविषयी अनेकांना अप्रूप आहे. ‘नासा’ने उपग्रहांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून पहिल्यांदा ते निदर्शनास आणून दिले. असे सांगितले जात असले, तरी रामसेतूवरून बरेच अंतर चालत जाऊ शकण्याचे १३ व्या आणि १६ व्या शतकातील उल्लेख आहेत. धनुषकोडी येथेही बिभीषण आणि श्रीराम यांच्या भेटीचे मंदिर आहे. रामेश्वरम् शिवलिंग हे स्वत: श्रीराम आणि सीतामाता यांनी सिद्ध केले आहे. भारतात श्रीरामाने वास्तव्य केलेली ३६ हून अधिक ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी आता श्रीरामाशी संबंधित मंदिरे, तीर्थक्षेत्र अथवा पवित्र कुंड आहेत. ही सर्व स्थाने मग पुरावा नाहीत का ? म्हणजे भारतातील अनेक ठिकाणी, श्रीलंकेतील काही ठिकाणी श्रीरामाशी संबंधित स्थाने आढळणे, हा पुरावा नाही तर काय आहे ? जे त्रिकाल आणि पूर्ण सत्य आहे, त्याला पुरावा का लागतो ? आणि हा पुरावा कोण मागत आहे ? जे श्रीरामाला मानतच नाहीत, ते लोक श्रीरामाच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करतात, म्हणजे हा मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. याच पक्षाचे एक मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी तर थेट ‘सनातन धर्म हा डेंग्यू, मलेरिया यांप्रमाणे असून त्याचे उच्चाटन करणे आवश्यक आहे’, असे अत्यंत अवमानकारक विधान केले होते. त्यासमवेत पक्षाचे ए. राजा यांनीही सनातन धर्माची तुलना एच्.आय.व्ही. आणि कुष्ठरोग या रोगांशी केली. बहुसंख्य सनातन धर्मियांच्या देशात एकाहून एक अशी सनातन धर्मविरोधी वक्तव्ये केली जातात; मात्र ती करणार्यांना काहीच शिक्षा होत नाही.
हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ !
ज्या देशात ‘राम राम’ म्हणून बहुसंख्य हिंदू दिवसाचा प्रारंभ करतात, तेथे श्रीरामाचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे सांगितले जाते, तरी सांगणार्यांवर काहीच कारवाई होत नाही, ही हिंदूंची सहिष्णुता नव्हे का ? इस्लामच्या प्रेषितांविषयी असे इस्लामी देशांमध्ये उघडपणे कुणी बोलू शकते का ? बोलल्यास त्याची काय अवस्था होईल ? हे त्याच्यासह इतरांनाही ठाऊक आहे. भाजपच्या माजी सदस्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानाचा धर्मांधांनी विपर्यास करून त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) धमक्या देण्यात आल्या आणि काही जणांंच्या हत्या करण्यात आल्या. सनातन धर्मीय कधी असे करत नाहीत, हा त्यांचा कमकुवतपणा समजून सनातन धर्माचे विरोधक धर्माच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करत आहेत. इस्लामी पाकमध्ये ईशनिंदा कायद्यामुळे तेथे इस्लामचा अवमान झाल्याची शंका जरी आली, तरी तेथे कठोर कारवाई होतेच. एवढेच नाही, तर असे करणार्याला पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पोलिसांच्या तावडीतून सोडवून त्याचे ‘मॉब लिंचिंग’ (जमावाकडून हत्या करणे) केले जाते. एवढी दहशत धर्माच्या अवमानाविषयी पाकमध्ये निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे सहसा अवमान होत नाही. भारतात असे काही होण्याची शक्यता हिंदु धर्मविरोधकांना वाटत नाही. परिणामी ते सहजतेने असभ्य, अभद्र, अवमानकारक विधाने हिंदु धर्म आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी करतात.
द्रमुकचा अंत निश्चित !
द्रमुक पक्षाचे नेते एम्. करुणानिधी यांनीही काही वर्षांपूर्वी ते हयात असतांना ‘श्रीराम झालाच नाही’, असे विधान अनेक वेळा केले होते. द्रमुकची स्थापनाच सनातन धर्मीय, म्हणजेच आर्यांना विरोध करण्यासाठी झाली. ‘आम्ही इतरांपासून वेगळे म्हणचे स्थानिक द्रविड आहोत’, हे सांगण्याच्या नादात हिंदु धर्माची अवहेलना करायची, त्याला कमीपणा येईल, असे काम करायचे, हा पक्षाचा कार्यक्रमच आहे. त्याच वेळी दुसर्या बाजूला ख्रिस्त्यांना मात्र जवळ करायचे, ख्रिस्ती संस्थांवर मेहेरनजर करायची इत्यादींमुळे तमिळ भूप्रदेशात ख्रिस्ती पंथ फोफावत आहे, त्याचप्रमाणे मुसलमानही त्यांचा आवाज वाढवत आहेत, म्हणजेच द्रमुकची विचारधारा केवळ सनातन धर्माला विरोध अशी नसून ख्रिस्ती आणि मुसलमान यांना पाठिंबा देणारी आहे. ‘जो सनातन धर्माचा शत्रू तो देशाचाही शत्रू’, हा सोपा नियम लक्षात घेतल्यास ‘द्रमुक देशविरोधीही आहे’, हे लक्षात येते.
तमिळनाडू येथे हिंदुत्वनिष्ठांसह अन्य काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. या राजकीय हत्याच होत्या ना ? या दिशेने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे. भाजप म्हणजे त्यांच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि या पक्षाचे खासदार पदाचे उमेदवार के. अण्णामलाई लोकसभेच्या निवडणुकीत हरल्यावर तेथील धर्मांधांनी एका बोकडाला त्यांच्या नावाची पाटी घालून त्याच्या मानेवरून सुरी फिरवून कत्तल केली. यातून धर्मांध आणि द्रमुक यांनी हिंदूंना एक मोठा संदेश दिला आहे, तो म्हणजे ‘आमच्या राज्यात कुणी हिंदूने कुठल्याही प्रकारे पुढे येण्याचा प्रयत्न केल्यास त्याची हत्या केली जाईल.’ हे सध्या केरळ आणि बंगाल या राज्यांमध्ये घडत आहे. तमिळनाडू येथे तर आरंभ झाला आहे. त्यामुळे तेथील हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे.
हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद यांची कथा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. असेच काहीसे द्रमुकचेही होत आहे. वारंवार ‘श्रीराम काल्पनिक आहे’, ‘श्रीराम झालाच नाही’, ‘श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा काय ?’, अशी विधाने करून ते साक्षात् सृष्टीनिर्मात्या श्रीरामालाच आव्हान देत आहेत, सर्वसामान्य हिंदूंची श्रीरामावरील श्रद्धा कमकुवत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. द्रमुकचा जन्मही झाला नव्हता, त्या आधी अनेक युगांपासून ‘प्रभु श्रीराम’ हे भारतीय जनमानसाला व्यापून आहेत. भारतीय मनातील श्रीराम द्रमुकच्या पापाचा घडा भरण्याची वाट पहात आहे, तो भरला की, द्रमुकचे अस्तित्व दिसणार नाही आणि त्यानंतर मात्र द्रमुकला ओळखणारे कुणी नसेल अन् तो पक्षही इतिहासजमा होईल, यात शंकाच नाही.
श्रीरामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणार्या राष्ट्र आणि धर्म विरोधी द्रमुक पक्षाचे अस्तित्व श्रद्धावान हिंदू निश्चितच मिटवतील ! |