छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध !
आंदोलक पोलिसांच्या कह्यात !
छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्ट या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्यावर होते. त्या निमित्ताने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र या कार्यक्रमाला जात असतांना सिल्लोड तालुक्याच्या जवळच असलेल्या भवन या गावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. या वेळी पोलिसांनी मराठा समाजाच्या दत्तात्रय पांढरे, सोमीनाथ कळम, रमेश काकडे यांसह इतर कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सध्या चालू नसले, तरी मराठा समाजाच्या वतीने विविध माध्यमांतून मागणी मांडण्यात येत आहे.