पश्चिम महाराष्ट्रात ८५ लाख वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी २२६ कोटी रुपयांचा परतावा !
कोल्हापूर – ‘महावितरण’कडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ८५ लाख ७७ सहस्र ४४२ लघु आणि उच्चदाब वीजग्राहकांना २२६ कोटी ५२ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजदेयकांमध्ये समायोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वीज वितरण आस्थापनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्युत् नियामक आयोगाच्या ‘विद्युत् पुरवठा संहिता २०११’च्या विनियम १३.१ अनुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. प्रतिवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते आणि त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक देयकाइतकी असेल, तर तेथे सरासरी मासिक देयकाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक देयकाच्या दीडपट घेण्याचे प्रावधान आयोगाकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजदेयकाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना देण्यात येते.
त्याप्रमाणे वर्ष २०२३-२४ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर ८५ लाख ७७ सहस्र ४४२ लघु आणि उच्चदाब वीजग्राहकांना २२६ कोटी ५२ लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.