आयुर्वेदाद्वारे कर्करोगग्रस्त ज्येष्ठ नागरिकांवर प्रभावी उपचार शक्य !
पुण्यातील वैद्यांचे कर्करोगावर संशोधन
पुणे – कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांवर ‘आयुर्वेदीय रसायन चिकित्सा’ उपयोगी ठरत असल्याचे संशोधन पुण्यातील वैद्यांनी केले आहे. याची नोंद वैद्यकशास्त्रातील नामांकित नियतकालिकानेही घेतली आहे. ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’ने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी २०२४’च्या (ए.एस्.सी.ओ.) शिकागो येथे भरलेल्या जागतिक परिषदेमध्ये ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहेत. आयुर्वेदीय रसायन चिकित्सेमुळे कर्करोग झालेल्या वयस्कर रुग्णांच्या जीवनाच्या दर्जामध्ये सुधारणा होऊन त्यांची चिंता आणि नैराश्य अल्प झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आयुर्वेद रसायन चिकित्सा पद्धत रुग्णांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’चे वैद्य योगेश बेंडाळे यांनी सांगितले की, कर्करोग झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सक्षम पर्याय म्हणून आयुर्वेदीय रसायन चिकित्सेचा विचार होऊ शकतो. रुग्णोपयोगी निष्कर्ष पहाता अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ होण्यासाठी यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.