साधकांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून देतांना हल्ली (जुलै २०२४ मध्ये) बहुतेकांसाठी न्यास करण्याचे मुख्य स्थान ‘सहस्रार’ मिळणे आणि आतापर्यंत न्यास करण्याच्या मुख्य स्थानामध्ये होत गेलेले पालट
‘सध्या आपत्काळ चालू आहे आणि त्याची तीव्रता वाढत जात आहे. त्यामुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांचा जोरही वाढत आहे. सनातन संस्थेच्या साधकांना याचा अनुभव प्रतिदिन येत आहे. वर्ष २०२४ मध्ये साधकांना स्वत:चे शारीरिक त्रास पुष्कळ प्रमाणात वाढले असल्याचे लक्षात येत आहे. त्याचे कारण मुख्यत्वे वाईट शक्ती याच आहेत. ‘आपत्काळाची तीव्रता वाढत गेल्यावर साधकांसाठी नामजपादी उपाय शोधून देतांना न्यास करण्याच्या मुख्य स्थानामध्ये कसा पालट झाला ?’, याचा अभ्यास मला करता आला. तो येथे दिला आहे.
१. सूक्ष्म घडामोडी कळण्यासाठी आज्ञाचक्र महत्त्वाचे असल्याने साधकांच्या आज्ञाचक्रावर वाईट शक्ती मुख्यत्वे आक्रमण करत असणे
वर्ष २०१२ पासून साधकांना नामजपादी उपाय शोधून देतांना असे लक्षात आले की, न्यास करण्याचे स्थान एक तर केवळ आज्ञाचक्र मिळते किंवा आज्ञाचक्र आणि त्याच्या जोडीला अन्य एक चक्र मिळते. साधक साधना करतात, म्हणजे अध्यात्माचा अभ्यास करतात आणि अध्यात्म कृतीत आणतात. अध्यात्म हे सूक्ष्म घडामोडींशी संबंधित आहे. ते कळण्यासाठी आज्ञाचक्र महत्त्वाचे असते. त्यामुळे वाईट शक्ती मुख्यत्वे साधकांच्या आज्ञाचक्रावर आक्रमण करतात.
२. आपण डोळ्यांद्वारे सर्व जग पहात असल्याने त्यांद्वारे चांगली किंवा वाईट शक्ती सहजतेने शरिरात ग्रहण होणे; म्हणून आज्ञाचक्रावर उपाय करण्यापेक्षा डोळ्यांवर उपाय करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे वर्ष २०२२ मध्ये लक्षात येणे
वर्ष २०२२ मध्ये माझ्या असे लक्षात आले की, आज्ञाचक्रावर उपाय करण्यापेक्षा डोळ्यांवर उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे; कारण आपण डोळ्यांद्वारे सर्व जग पहात असल्याने त्यांद्वारे चांगली किंवा वाईट शक्ती सहजतेने आपल्या शरिरात ग्रहण होते. डोळे हे तेजतत्त्वाशी संबंधित असतात. तसेच असेही लक्षात आले की, आध्यात्मिक उपाय करतांना कुंडलिनीचक्रांमधील त्रासदायक शक्ती दूर केली, तरी डोळ्यांमध्ये त्रासदायक शक्ती शिल्लक रहातेच. त्यामुळे शेवटी डोळ्यांवर उपाय केले की, शरिरातील त्रासदायक शक्ती पूर्णपणे दूर होते.
३. मार्च २०२३ पासून उपायांचे मुख्य स्थान ‘डोक्याची डावी बाजू’ हे येत असणे; कारण वाईट शक्तींनी साधकांच्या कृतींवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर आक्रमण करणे चालू केलेले असणे
मार्च २०२३ पासून उपाय शोधतांना असे लक्षात आले की, उपायांचे मुख्य स्थान ‘आज्ञाचक्र’ किंवा ‘डोळे’ नाही, तर ‘डोक्याची डावी बाजू’ आहे आणि तेथे उपाय केले, तर ते जास्त परिणामकारक होत आहेत. डोक्याचा भाग हा मेंदूशी संबंधित असतो. मेंदू हा आपल्या कृतींचे नियमन करतो. त्यामुळे वाईट शक्ती साधकाच्या मेंदूवर आक्रमण करून त्याच्या कृतींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच गेली २ दशके वाईट शक्ती साधकांवर अधिकतर सूक्ष्मातून आक्रमण करत होत्या; पण आता साधकांची साधना वाढल्याने त्या हरत आहेत. त्यांची शक्ती अल्प होऊ लागल्याने त्या आता साधकांना शारीरिक त्रास देऊ लागल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे वाईट शक्तींनी साधकांच्या कृतींवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर आक्रमण करणे.
३ अ. शारीरिक त्रासावर उपाय करण्यासाठी ‘डोक्याची उजवी बाजू’ या स्थानावर आणि आध्यात्मिक त्रासावर उपाय करण्यासाठी ‘डोक्याची डावी बाजू’ या स्थानावर उपाय करणे आवश्यक असल्याचे लक्षात येणे : पुढे असेही लक्षात आले, ‘त्रासाचे कारण शारीरिक असेल, तर उपायांचे मुख्य स्थान ‘डोक्याची उजवी बाजू’ येते’, उदा. सर्दी किंवा खोकला झाला असेल, तर ‘विशुद्धचक्रा’वर उपाय करण्याबरोबरच ‘डोक्याच्या उजव्या बाजू’वर उपाय करणेही आवश्यक असते. तसेच सर्दी किंवा खोकला ज्या आध्यात्मिक कारणामुळे झाला आहे, त्यावर उपाय करण्यासाठी ‘डोक्याची डावी बाजू’, हे मुख्य स्थान आणि ‘मणिपूरचक्र’ यांवर उपाय करावे लागतात.
४. मे २०२४ पासून साधकांच्या आध्यात्मिक त्रासांवर उपाय शोधतांना बहुतेक वेळा ‘डोक्याची डावी बाजू’, हे मुख्य स्थान न मिळता ‘सहस्रार’, हे स्थान मिळू लागणे, तसेच शारीरिक त्रासांवर उपाय शोधतांनाही ‘सहस्रार’, हे मुख्य स्थान मिळणे आणि त्यावरून आपत्काळाची भीषणता लक्षात येणे
डोक्याच्या वरच्या मध्यभागात असलेले मनुष्याचे ‘सहस्रार’ हे आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ महत्त्वाचे स्थान आहे. सहस्रारावर आध्यात्मिक उपाय केले की, सर्व चक्रांवर उपाय होतात; कारण मूलाधारचक्रापासून सहस्रारापर्यंत आलेल्या सुषुम्ना नाडीद्वारे सर्व चक्रांना उपायांची ऊर्जा मिळते. एखादी व्यक्ती अत्यवस्थ असेल, तर सहस्रारावर उपाय केल्यावर लाभ होतो; कारण सहस्रारामध्ये सूर्यनाडी आणि चंद्रनाडी याही आलेल्या असून त्यांची तोंडे उघडी असतात. या दोन नाड्यांद्वारे उपायांची शक्ती शरीरभर पोचू शकल्याने लगेच लाभ होतो.
मे २०२४ पासून साधकांच्या आध्यात्मिक त्रासांवर उपाय शोधतांना बहुतेक वेळा मला ‘डोक्याची डावी बाजू’, हे मुख्य स्थान न मिळता ‘सहस्रार’, हे स्थान मिळू लागले. यावरून ‘आपत्काळाची तीव्रता आणखी वाढली आहे आणि वाईट शक्ती आणखी तीव्रतेने आक्रमणे करू लागल्या आहेत’, असे लक्षात आले. ‘आतापर्यंत ६ व्या पाताळातील वाईट शक्ती आक्रमणे करत होत्या; पण आता होत असलेल्या आक्रमणांपैकी ३० टक्के आक्रमणे ही ७ व्या (शेवटच्या) पाताळातील वाईट शक्ती करू लागल्या आहेत’, असेही जाणवले. यावरून आपत्काळाची भीषणता लक्षात येते.
शारीरिक त्रासांवर उपाय शोधतांनाही आता ‘डोक्याची उजवी बाजू’, हे मुख्य स्थान न मिळता ‘सहस्रार’, हे मुख्य स्थान मिळते.
५. साधकांच्या सर्वसाधारण त्रासावर उपाय शोधल्यावर बहुतेक वेळा ‘सहस्रार’, हे मुख्य स्थान, तर ‘मणिपूरचक्र’, हे दुय्यम स्थान मिळणे
सध्या (जुलै २०२४ मध्ये) साधकांना जेव्हा सर्वसाधारण त्रास होत असतो, तेव्हा त्यांच्यासाठी उपाय शोधल्यावर वाढलेल्या आपत्काळाला अनुसरून मुख्य स्थान बहुतेक वेळा ‘सहस्रार’ मिळते, तसेच दुसरे स्थान ‘मणिपूरचक्र’ मिळते. ‘मणिपूरचक्रा’शी संबंधित ‘पोट’ हे अवयव आहे. पोटामध्ये पोकळी असल्याने वाईट शक्तींना तेथे त्रासदायक शक्ती साठवून ठेवणे सोपे असते; म्हणून त्या तेथे प्राधान्याने आक्रमण करतात. हे आक्रमण दूर करण्यासाठी मणिपूरचक्रावर उपाय करावे लागतात.
माझ्याकडून आध्यात्मिक उपायांच्या संदर्भातील हे संशोधन गुरुकृपेनेच घडले. यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.७.२०२४)
|