सावंतवाडी न्यायालयातून पसार झालेल्या बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात पोलिसांना यश
सावंतवाडी – तालुक्यातील बळवंतनगर, बांदा येथे अवैधरित्या वास्तव्य केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक महंमद शांतो सलीम सरकार (वय २० वर्षे) हा ३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. सरकार पसार झाल्याचे लक्षात येताच त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. अखेर इन्सुली पोलीस तपासणी नाक्याजवळ सरकार याला पकडण्यात पोलिसांना यश आले आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
तालुक्यातील बळवंतनगर (बांदा) येथे २३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी महंमद शांतो सलीम सरकार, महंमद राजो, महंमद शाहिद मुल्ला, महंमद रुबेल उपाख्य आसदऊल हारुन खान, महंमद शाहिदुल ऊरमणिरुल हारुन खान, महंमद अन्वर अब्दुल हाशिम अकोंडा आणि मुमताज बेगम (सर्व रहाणार बांगलादेश) हे सर्व जण बळवंतनगर येथील गुलजार खान यांच्या चाळवजा घरात रहात होते. देशात रहाण्यासाठी अधिकृत कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे अवैधरित्या वास्तव्य केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या सर्वांच्या विरोधात सावंतवाडी न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. या सर्वांना ३ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्या वेळी यातील महंमद शांतो सलीम सरकार हा आरोपी पसार झाला होता.
अवैधरित्या वास्तव्याच्या प्रकरणी शिक्षा
या प्रकरणाच्या ३ ऑगस्ट या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने यांपैकी ४ जणांना २ वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी १० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली, तर महंमद अन्वर अब्दुल हाशिम अकोंडा आणि मुमताज बेगम यांची निर्दाेष मुक्तता केली. ही शिक्षा ऐकल्यावर शौचालयाला जात असल्याचे सांगत सरकार पसार झाला.