पिंपरी (पुणे) येथील अनधिकृत विज्ञापन फलकधारकांसाठी अनुमती घेण्याविषयी सूचना !
पिंपरी (पुणे) – पी.एम्.आर्.डी.ए. (पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या) प्रशासनाने अनधिकृत विज्ञापन फलकांवरील (होर्डिंग) कारवाई अधिक तीव्र केली आहे. त्यामुळे सर्वच विज्ञापन फलकधारकांनी पी.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्त योगेश म्हसे यांची भेट घेतली. ‘कारवाई न करता रितसर संमतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘त्वरित अधिकृत अनुमती घ्यावी’, अशी सूचना करण्यात आली.
पी.एम्.आर्.डी.ए.च्या क्षेत्रातील मुख्य चौक, गर्दी अथवा वर्दळीच्या ठिकाणी, अधिक लांबी, रुंदी आणि उंचीचे, तसेच उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे विज्ञापन फलक आढळून आले आहेत. हे उभारतांना अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पी.एम्.आर्.डी.ए.कडून हे विज्ञापन फलक अनधिकृत ठरवण्यात आले. आतापर्यंत २५ हून अधिक फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.
अनधिकृत फलकांना रितसर अनुमतीसाठी प्राधिकरणामध्ये ८८० प्रस्ताव प्राप्त आले आहेत; परंतु निम्म्याहून अधिक प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. परिणामी त्याविषयी पुन्हा कार्यवाही करण्याची पत्रे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.