हिंदु विचारवंतांनी संघटित होऊन बौद्धिक बळाच्या आधारे सनातन धर्म अन् सनातन भारत यांचे रक्षण केले पाहिजे !

१. उद्देश

चर्चा आणि संवाद ही सनातन धर्माची प्राचीन परंपरा आहे. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः ।’, म्हणजे ‘वाद-संवादातून सत्यतत्त्वाचा बोध प्राप्त करणे’, ही सनातन परंपरा होती; म्हणूनच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून गीता उत्पन्न झाली. गार्गी-मैत्रेयी आणि याज्ञवल्क्यऋषि यांच्या संवादातून ‘बृहदारण्यक उपनिषद’ जन्माला आले. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजनैतिक संवादातून ‘कौटिलीयम् अर्थशास्त्रम्’ संग्रहित झाले. सनातन भारतात नेहमीच प्रबुद्ध म्हणजे ज्ञानी किंवा विद्वान लोकांनी चर्चा करणे, हे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे मानले गेले होते.

आज दुर्दैवाने मात्र ‘मिडिया’ (प्रसिद्धीमाध्यमे), ‘सोशल मिडिया’ (सामाजिक माध्यमे), ‘फिल्म मिडिया’ (चित्रपट माध्यम), ‘ॲकेडेमिया’ (शिक्षणक्षेत्र) किंवा ‘लिट फेस्टिव्हल्स’मध्ये जी ‘सेक्युलर’वादाच्या (निधर्मीवादाच्या) तत्त्वांवर चर्चा केली जात आहे, ती ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’वर (विचार ठरवून प्रचार करण्यावर) आधारित असते. जो अजेंडा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केलेला असतो, त्यातून सत्याचा तत्त्वबोध कसा होणार ? उलट त्यामुळे समाज, देश, राष्ट्र आणि धर्म यांचे अधःपतन होत आहे.

१ अ. बौद्धिक आक्रमणांचे आव्हान !

सध्याच्या काळात ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’ (विचार आधारित प्रचार) करणार्‍या व्यक्ती या केवळ अभिव्यक्ती नाहीत, तर देशविरोधी आणि सनातन धर्मविरोधी शक्ती आहेत, हे आपण सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. ते अभिव्यक्ती म्हणून कार्य करत असले, तरी ते देशविरोधी ‘इकोसिस्टीम’चे (परस्परांना पोषित करणार्‍या व्यवस्थेचे) सदस्य आहेत. या इकोसिस्टीममध्ये ‘सेक्युलरिस्ट’ आहेत, ‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) आहेत, ‘मिशनरिस्ट’ (ख्रिस्ती) आहेत आणि ‘जिहादीस्ट’ही आहेत.

बर्‍याचदा बौद्धिक आक्रमणे करणार्‍या अभिव्यक्तींमध्ये ‘ॲथिस्ट’ किंवा ‘रॅशनलिस्ट’ म्हणजेच नास्तिकतावादी किंवा काही वेळा ‘फेमिनिस्ट’ म्हणजे स्त्रीस्वातंत्र्यवादी दिसत असतात. या अभिव्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी त्या ‘कम्युनिस्ट इकोसिस्टीम’च्या, म्हणजेच ‘अर्बन नक्षलवादी गँग’च्या सदस्य असतात. आजच्या काळात ‘ॲथिस्ट’, ‘रॅशनलिस्ट’, ‘कम्युनिस्ट’ आणि ‘अर्बन नक्सलाईट’ (शहरी नक्षलवादी) ही समानार्थी नावे असून ते एकाच टोळीचे सदस्य आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

श्री. चेतन राजहंस

अ. ही मंडळी संधीसाधू असून ते निवडक विषयांवर नेहमीच चर्चा टाळतात. केरळच्या शबरीमला मंदिरामध्ये स्त्रीप्रवेशावर खुलेआम चर्चा करणार्‍या ‘फेमिनिस्टस्’ या मशिदींतील स्त्रियांच्या प्रवेशबंदीवर, ‘लव्ह जिहाद’वर किंवा श्रद्धा वालकरच्या शरिराचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबच्या राक्षसी कृत्यावर ‘सिलेक्टिव्ह सायलन्स’ (विशेष मौन) ठेवतात. अखलाकच्या हत्येनंतर ‘पुरस्कारवापसी’ करणारे साहित्यिक हे राजस्थानमधील गरीब शिंपी कन्हैय्यालालचे ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) झाल्यानंतरही ‘सिलेक्टिव्ह’ मौन धारण करतात !

या ‘सिलेक्टिव्ह सायलन्स’वर आपण चर्चा घडवली पाहिजे आणि यांचे वैचारिक बुरखे फाडले पाहिजेत.

आ. एक वेळ अशी होती की, दूरदर्शनवरील निवेदकाने एखादा अयोग्य शब्द बोलल्यानंतर दिवसभर त्यावर चर्चा व्हायची. आज रविश कुमार देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाणचे छायाचित्र दाखवून त्याला खुलेआम अनुराग मिश्रा नावाचा हिंदु असल्याचे सांगतो आणि त्यावर कुठलीही चर्चा होत नाही. मी पत्रकारितेच्या क्षेत्रातील असल्याने मी अनुभवाच्या आधारे सांगू शकतो की, कुठलीही बातमी ही एक ‘फिनिश्ड प्रोडक्ट’ (अंतिम उत्पादन) असते. संपूर्ण माहिती आणि निश्चिती यांच्या आधारे बातमी प्रसारित केली जाते. त्यामुळे ती ‘फेक’ (खोटी) असू शकत नाही; परंतु ‘मिडिया’मध्ये बसलेले ‘अर्बन (शहरी) नक्षली’ अभिव्यक्तीच्या नावाखाली खोट्या बातम्या सर्रास प्रसारित करतात. त्यामुळेच आजकाल ‘फॅक्ट चेकर्स’ (खरे-खोटे करणारे) नावाची नवी जमात जन्माला आली आहे ! या ‘फॅक्ट चेकिंग’च्या नावाखालीही हिंदूंच्या विरोधात प्रचार केला जातो. नुपूर शर्माच्या विरोधात देशभरात वातावरण भडकावणारा महंमद जुबेर होता; मात्र त्याला कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पुरस्कृत केले. ध्रुव राठीचा खोटेपणा उघड करणार्‍या एका कॅरोलिना गोस्वामी या विदेशी मूळ असणार्‍या भारतप्रेमी महिलेलाही खूप धमक्या देण्यात आल्या.

इ. आजच्या ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये ‘सोशल मिडिया’ला कुठलीही ‘सेन्सॉरशिप’ (नियंत्रण मंडळ) नसल्याने एखाद्या घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. ‘पहिली प्रतिक्रिया आणि नंतर परसेप्शन’ (समज) देण्यामध्ये या ‘इकोसिस्टीम’चे (यंत्रणा) सदस्य मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्यांचे आव्हान आपल्यासमोर आहे.

ई. गेली २-३ दशके सतत चित्रपटांतून सनातन धर्मविरोधी ‘नॅरेटिव्ह सेट’ (कथित कथानके) करण्याचा प्रयत्न या ‘इकोसिस्टीम’ने पद्धतशीरपणे केला. आज सुदैवाने ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’, ‘अजमेर ९२’, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांच्या माध्यमांतून खोट्या ‘नॅरेटिव्ह’च्या संदर्भात वस्तूस्थिति समोर आणण्याचे कार्य चालू झाले आहे.

उ. ‘ॲकेडेमिया’, म्हणजे शिक्षणक्षेत्रात अर्बन नक्षलवादी विचारांच्या जे. साईबाबासारख्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांची पद्धतशीरपणे वैचारिक धारणा नासवण्याचे कार्य कित्येक वर्षे चालू आहे. त्यांचे बौद्धिक आव्हान आपल्यासमोर आहे.

ऊ. ज्युडिशिअरी, म्हणजेच न्यायपालिकेत बसलेल्या अर्बन नक्षलवाद्यांपासूनही आपल्याला तितकेच सावधान रहाण्याची आवश्यकता आहे; कारण ते न्यायासनावर बसून सनातन धर्मविरोधी निर्णय देत आहेत.

१ आ. वैचारिक ध्रुवीकरणाचा काळ : गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात वैचारिक ध्रुवीकरण, म्हणजेच ‘पोलरायझेशन’ चालू आहे. उद्योग, राजकारण, मिडिया, कलाविश्व, क्रीडाक्षेत्र असे कुठलेही क्षेत्र या ‘पोलरायझेशन’पासून अलिप्त राहिलेले नाही. पुढील ५ वर्षे या ‘पोलरायझेशन’च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. यासाठी आपल्या सर्वांना प्रभावीपणे बौद्धिक-वैचारिक योगदान द्यावे लागणार आहे.

२. बौद्धिक कार्याची आवश्यकता

२ अ. रणनीती ठरवणार्‍या भूमिका निश्चित (स्ट्रॅॅटेजिक नॅरेटिव्ह सेटिंग) करणे : हे महत्त्वाचे कार्य आपल्या सर्वांना येणार्‍या काळात करावे लागणार आहे. वर्ष १९४७ पासून भारतात वैचारिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय आणि माध्यमे या क्षेत्रांत साम्यवाद्यांचे प्रस्थ राहिले आहे. ते प्रतिदिन या सर्व माध्यमांचा उपयोग करून देशविरोधी आणि सनातन धर्मविरोधी विचार प्रसारित करतात. त्यांना विरोध करण्यासाठी आपणही रणनीती ठरवणार्‍या भूमिका निश्चित केल्या पाहिजेत.

‘वक्फ बोर्डा’च्या ‘लँड जिहाद’च्या संदर्भात धार्मिक सूत्र उपस्थित करून सहानुभूती मिळवणार्‍या मंडळींना उत्तर देण्यासाठी ‘सब भूमी गोपालकी’ असे आपले ‘स्ट्रॅटेजिक नॅरेटिव्ह’ असले पाहिजे.

२ आ. सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या अर्बन नक्षलवाद्यांना रोखणे : हेही एक सध्याच्या काळातील आवश्यक कार्य आहे. आज सनातन धर्माला नष्ट करण्याचे षड्यंत्र चालू झाले आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’ (जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठीची परिषद), ‘सनातन इरॅडीकेशन कॉन्फरन्स’ (सनातन धर्म नष्ट करण्यासाठीची परिषद) या हिंदु धर्मविरोधी परिषदांचे आयोजन केले जात आहे. मंदिरांमध्ये पारंपरिक वस्त्रे परिधान करण्याला विरोध केला जात आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे मानणार्‍या साम्यवादी महिला केरळच्या शबरीमला मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. कोरोनाच्या काळात वर्ष २०२१ मध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्याला देशातील आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून खलनायकाप्रमाणे चित्रीत करण्यात आले. त्यांचा उद्देश सनातन धर्म, कुंभमेळा आणि त्याचे आयोजन करणारे राष्ट्रवादी सरकार यांना लक्ष्य करणे, हा होता. लक्षात घ्या, ही सर्व सनातन धर्मविरोधी षड्यंत्रे आहेत आणि ती प्रतिदिन अर्बन नक्षली रचत आहेत. अशांना रोखण्यासाठी बौद्धिक सिद्धता आपल्याला करावी लागणार आहे.

२ इ. हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ भूमिका प्रस्तुत करणे : हे येणार्‍या काळातील एक महत्त्वाचे दायित्व आपल्या सर्वांचे असणार आहे. ‘भारत हे अनादि काळापासून हिंदु राष्ट्रच होते, आजही आहे आणि भविष्यातही अनंत काळासाठी असणार आहे’, अशी ठाम भूमिका हिंदूंची असली पाहिजे. हिंदु राष्ट्राची भूमिका राजनैतिक, संवैधानिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा अनेकविध पैलूंद्वारे आपल्याला भारतासमोर ठेवावी लागणार आहे. प्रत्येकाने आपल्या अभ्यासानुसार, आकलनानुसार आणि हिंदु राष्ट्र-विरोधकांचे खंडण करणे सुलभ होईल, अशा प्रकारे हिंदु राष्ट्राचे समर्थन करायला हवे. आमचे गुरुदेव आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी १९९८ मध्ये संकलित केलेल्या ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या ग्रंथामध्ये म्हटले होते, ‘हिंदु राष्ट्र म्हणजे ‘अध्यात्मावर आधारित राज्यव्यवस्था’ ! भारतात अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था आली, तरच तो विश्वकल्याणाचे कार्य करू शकतो. यासाठी त्यांनी हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतांना केवळ हिंदुहिताची राज्यव्यवस्था एवढा मर्यादित अर्थ न ठेवता, ‘विश्वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांचे राष्ट्र’, असा व्यापक अर्थ सांगितला.

हिंदु जनजागृती समितीही हिंदु राष्ट्राची संवैधानिक भूमिका मांडतांना ‘भारतीय राज्यघटनेत असंवैधानिक पद्धतीने घुसडण्यात आलेला ‘सेक्युलर’ (निधर्मी) हा शब्द वगळून ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द समाविष्ट करा’, अशी मागणी करत आहे. अशा प्रत्येकाच्या स्वअभ्यासानुसार आणि आकलनानुसार हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ भूमिका असू शकतील. त्यांनीही त्या मांडणे आवश्यक आहे.

३. आवाहन

खरे तर विचारवंत बौद्धिक मतभेदांमुळे संघटित होऊ शकत नाहीत, असे आतापर्यंत मानले जात होते; मात्र आता आपल्याला हा निष्कर्ष पालटण्याची वेळ आली आहे. विरोधकांकडे असणारे धनसामर्थ्य, सत्तासामर्ध्य, विदेशी हस्तकांचे पाठबळ इत्यादी लक्षात घेतल्यास सनातन धर्माच्या रक्षणासाठी आपण आता लहान लहान मतभेद विसरून संघटित झाले पाहिजे. आपण आपल्या बौद्धिक बळाच्या आधारे सनातन धर्म अन् सनातन भारताचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी केवळ आज इथेच नव्हे, तर यापुढेही बौद्धिक संघर्षासाठी विविध ठिकाणी एकत्र येऊन लढण्याचा निश्चय आज आपण केला पाहिजे.

सर्वांत शेवटी एवढेच सांगतो की, बौद्धिक आक्रमणांमुळे आज भारतीय समाज ‘ब्रेनवॉश्ड’ (बुद्धीभेद) आहे. त्यांची खर्‍या अर्थाने मतीस्वच्छता म्हणजे ‘ब्रेन वॉशिंग’ करण्याची आवश्यकता आहे. आपण सर्व हिंदुत्वनिष्ठ या बौद्धिक युद्धाला समर्थपणे उत्तर देणे अपेक्षित आहे !

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

संपादकीय भूमिका

‘हिंदु राष्ट्र म्हणजे ‘अध्यात्मावर आधारित राज्यव्यवस्था’ ! भारतात अध्यात्मकेंद्रित राज्यव्यवस्था आली, तरच तो विश्वकल्याणाचे कार्य करू शकतो !