संत नामदेवांनी १२ व्या शतकात सामाजिक समरसता साधली ! – ह.भ.प. मिलिंद चवंडके महाराज

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी नामसप्ताह सोहळ्याची सांगता

ह.भ.प. मिलिंद चवंडके महाराज

अहिल्यानगर – संत नामदेवांनी १२ व्या शतकात अभंगांमधून समाजप्रबोधन करत सामाजिक समरसता साधली. मध्ययुगीन सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि पारमार्थिक इतिहासावर आपल्या अलौकिक धार्मिक कार्याची दिव्य भगवी पताका प्रभावीपणे फडकवत ठेवली, असे प्रतिपादन ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी केले.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी नामसप्ताह सोहळ्याची सांगता प्रवचनाने करतांना ते बोलत होते. येथील डावरे गल्लीतील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. मंदिराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कविटकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष महेश जाधव, सचिव अभिजित पाडळकर, सहसचिव मयूर नेवासकर, खजिनदार सुजित चांडवले, ज्ञानेश्वर पवार, प्रसाद मांढरे, दिगंबर हिरणवाळे, गणपत पंगुडवाले, दिलीप शहापूरकर, सौ. निर्मला होनराव यांच्यासह श्रोतृवृंद प्रवचनास उपस्थित होता.

ह.भ.प. चवंडके महाराज पुढे म्हणाले, ‘‘नाथ संप्रदायाचा वारसा लाभलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासाने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत भारतभ्रमण केले. थेट पंजाबपर्यंत जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिणारे ते आद्य चरित्रकार होत. ३ सहस्र ५०० हून अधिक अभंग लेखन केलेल्या नामदेव महाराजांचे अभंग हिंदी आणि पंजाबी भाषेतही आहेत. शिखांच्या ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये ‘नामदेवजीकी मुखबाणी’ या नावाने ६१ पदे आहेत. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’, अशी साहित्य निर्मिती करत नामदेवांनी भक्तीचा प्रसार केला. अठरा पगड जातींना एकत्र करून सामाजिक समता निर्माण करण्यात योगदान दिले.’’

समाजातील जातीभेद मिटवतांना समाज परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. ज्ञानेश्वरांसमवेत काशीयात्रा करून पंढरपुरला आल्यावर विविध जातींतील लोकांना चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र बसवून जेवू घालत मावंदे केले. चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी, कान्होपात्रा, जनाबाई, रोहिदास या संतमेळ्यात राहिलेल्या नामदेवांना विसोबा खेचर हे अध्यात्मिक गुरु लाभले. अमृताहून गोड अभंग वाणीमधून त्यांनी तत्कालिन समाजातील बदलांचे चित्रण मांडले. संत नामदेवांच्या वाङमयीन कार्याने भारताला सांप्रदायिक जीवनाची एक दिशा मिळवून दिली. पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेतांना प्रथम नामदेव महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घ्यावे लागते. येथील ‘नामदेव पायरी’ नामदेव महाराजांच्या अलौकीक कार्याची आठवण करून देते.

ज्ञानेश्वरांनी प्रवर्तीत केलेल्या भागवत धर्मप्रसाराचे महान कार्य नामदेवांनी केले. ज्ञानेश्वरांनी प्रतिपादन केलेले तत्त्वज्ञान नामदेवांनी आपल्या वाणीने सुबोध, रसाळ आणि मधुर बनविले. भक्तीचा मळा फुलवला. नामाला देवत्वाची प्रतिष्ठा मिळवून दिली. नामदेवांच्या ज्ञान, कर्म आणि भक्ती या त्रिवेणी संगमात वारकरी संप्रदाय पावन झाला, हे सांगताना चवंडके महाराजांनी अभंगांचे दिलेले विविध दाखले भाविकांना अधिक भावले.