संपादकीय : ‘इमेन खेलीफ’चा ‘पंच’ अनैतिकच !
खेळांची सर्वाेच्च स्पर्धा म्हणून ‘ऑलिंपिक स्पर्धा’ हा जगात मोठ्या प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. या स्पर्धेत पदक मिळवणारे खेळाडू ‘जगज्जेते’ म्हणून लौकिक प्राप्त करतात. त्यामुळे ऑलिंपिकची स्पर्धा हा चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा विषय असणे, हे स्वाभाविकच आहे; मात्र या वर्षी पॅरिस येथे चालू असलेली ऑलिंपिक स्पर्धा स्वत:ला ‘महिला’ म्हणून सांगणार्या पुरुष बॉक्सरला महिला बॉक्सरसमवेत स्पर्धेत उतरवल्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. १ ऑगस्ट या दिवशी झालेल्या या ६६ वजनी महिला गटाच्या बॉक्सिंगच्या सामन्यात अल्जेरिया या देशाचा ‘इमेन खेलीफ’ या ‘पुरुष’ बॉक्सरची स्पर्धा इटलीच्या एंजेला कॅरिनी या महिला बॉक्सरसमवेत लावण्यात आली. यामध्ये इमेन खेलीफ याने पहिल्या २ गुद्यांतच एंजेला कॅरिनी हिचा पराभव केला. अवघ्या ४६ सेकंदांमध्येच एंजेला यांनी पराभव स्वीकारला. या अनैसर्गिक सामन्याचे पडसाद जगभर उमटले. अनेकांनी या सामन्याचा निषेध करत ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटने’वर टीका केली आहे; परंतु या टीकेनंतरही ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटने’ने एंजेला कॅरिनी अन् इमेन खेलीफ यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्याचे समर्थन केले आहे. ऑलिंपिक स्पर्धेतील बॉक्सिंगच्या पुढील उपांत्य सामन्यात इमेन खेलीफ याला खेळण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने अनुमती दिली आहे. त्यामुळे इमेन खेलीफ या ‘पुरुषा’ची पुढची लढत अन्य एका महिला बॉक्सरसमवेत होणार आहे; परंतु हा विषय केवळ एंजेला कॅरिनी आणि इमेन खेलीफ यांच्यातील सामन्यापुरता मर्यादित नाही. ऑलिंपिक सामन्यांमध्ये जगातील २०० हून अधिक देश सहभागी झाले आहेत. जगातील सर्वाेच्च खेळाच्या या स्पर्धेत अशा ‘पुरुषा’ला महिलेसमवेत खेळण्यास अनुमती देणे, म्हणजे भविष्यात जगभरात खेळल्या जाणार्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही या प्रवृत्तीला अनुमोदन देण्यासारखे ठरणार आहे. या अनैसर्गिक प्रकारामुळे खेळाचा तर र्हास होईलच, याही पेक्षा समाजात लिंगपालट करण्याचा स्वैराचार अधिक फोफावण्याचा धोका बळावू शकतो. इमेन खेलीफ याने येत्या सामन्यांमध्येही स्पर्धक महिलांना पराभूत करून पदक प्राप्त केले, तर चंगळवादी पाश्चात्त्य देशांमध्ये या अपप्रवृत्तीला अधिक बळ मिळेल. कालांतराने याचे पडसाद आशिया खंडातही उमटायला वेळ लागणार नाही. याचे समाजघातक परिणाम लक्षात घेऊन अशा प्रकारांना जगभरातून वेळीच विरोध होणे आवश्यक आहे.
भारतात वर्ष २०२३ मध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या वेळी इमेन खेलीफ यांची लिंगाशी संबंधित चाचणी करतांना त्याच्यामध्ये पुरुषाच्या लिंगाची गुणोत्तरे आढळून आली होती. त्यामुळे या स्पर्धेत महिलांसमवेत बॉक्सिंग खेळण्यास इमेन खेलीफ याला अपात्र ठरवण्यात आले होते. असे असूनही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने इमेन खेलीफ यांना ऑलिंपिक स्पर्धेत ‘महिला’ म्हणून खेळण्यास अनुमती दिली. हे प्रकरण अंगाशी आल्यावर मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने इमेन खेलीफ याने यापूर्वी महिला म्हणून अनेक स्पर्धा खेळल्याचे सांगून स्वत:च्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुष म्हणून नैसर्गिक प्रकृतीने जन्मलेल्या व्यक्तीचे शस्त्रक्रियेने लिंग पालटले, तरी त्या व्यक्तीची नैसर्गिक भावना आणि निसर्गदत्त क्षमता पालटत नाही. त्यामुळे महिला स्पर्धक म्हणून खेळणार्या अशा ‘पुरुषां’ना अपात्र ठरवणे, हेच नैसर्गिक न्यायाचे ठरेल.
पाश्चात्त्य देशात धोका !
मागील काही वर्षांपासून स्वत:च्या इच्छेनुसार लिंग पालटण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. पुरुष म्हणून जन्माला आलेल्या व्यक्ती स्वत:चे लिंग पालटून स्त्री होणे, हा प्रकार ‘वोकिझम्’ म्हणून बळावत चालला आहे. अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये या स्वैराचाराला अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजमान्यता दिली आहे. अमेरिकेत तर महाविद्यालयीन युवकांना स्वत:चे लिंगपालट करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना घेता येतो. यामध्ये आई-वडिलांनी आडकाठी आणली, तर त्यांना गुन्हेगार ठरवले जाते. एकदा शस्त्रक्रिया करून लिंगपालट करण्यात आला, तर पुन्हा शस्त्रक्रिया करून मूळ लिंग प्राप्त करता येत नाही. त्यामुळे लिंगपालट झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर त्या अवस्थेतच रहावे लागते. त्यामुळे लिंगपालट झाल्यावर पश्चात्ताप झाला, तरी चूक सुधारण्याची संधी नाही. यामुळे पाश्चात्त्य देशांमध्ये ‘वोकिझम्’मुळे अनेकांचे जीवन नरकमय झाले आहे. त्यामुळे आधुनिकतावादाच्या नावाखाली चालू झालेल्या या हिडिस प्रकाराला वेळीच आळा घातला नाही, तर त्याचे घातक परिणाम समाजाला भोगावे लागतील. त्यामुळे इमेन खेलीफ याला महिलेसमवेत खेळण्यास मान्यता, म्हणजे ‘वोकिझम्’सारख्या घातक प्रवृत्तीला जागतिक मान्यता प्रदान केल्याप्रमाणे ठरेल.
आधुनिकतेच्या नावाखाली षड्यंत्र !
मागील काही वर्षांपासून आधुनिकतेच्या नावाखाली साम्यवाद्यांनी भारतात ‘समलिंगी विवाह’, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे पाश्चात्त्य प्रकार भारतात जाणीवपूर्वक रूजवण्याचा प्रयत्न केला. याविषयीचे खटले न्यायालयात चालवून माध्यमांवरून त्यांची जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणली. समलिंगी विवाहाला अद्याप भारतात मान्यता नसली, तरी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही प्रथा भारतातील उच्चभ्रू लोकांमध्ये जलद गतीने पसरू लागली आहे. विवाहापूर्वी एकमेकांना समजून घेण्याच्या नावाखाली भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; परंतु सद्यःस्थितीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित करून एकमेकांना सोडण्याचे, तसेच त्यानंतर विवाह करून घटस्फोट देण्याचेच प्रकार वाढले आहेत. ‘लिंगपालट’ हा स्वैराचारही अशाच प्रकारे समाजव्यवस्था नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक रुजवला जात आहे.
एरव्ही स्त्री-पुरुष समानता म्हणून भारतातील कुटुंबव्यवस्थेत साम्यवादी मंडळी कलह निर्माण करतात; मात्र लिंग पालटून महिला स्पर्धकाला आव्हान देणार्या पुरुषांविषयी ही मंडळी मूग गिळून गप्प रहातात. त्यामुळे इमेन खेलीफ याने एंजेला कॅरिनी यांना मारलेला ‘पंच’ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने वैध ठरवला असला, तरी लिंगपालट करून अनैसर्गिक प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या या प्रकाराला भारतियांनी तरी अनैतिकच ठरवायला हवे. साम्यवादाची ही कीड भारतात फोफावू नये, यासाठी भारत सरकार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी सतर्क रहायला हवे.
‘वोकिझम्’ या आधुनिक साम्यवादाच्या नावाखाली ‘पुरुषां’ना महिलांसमवेत खेळू देणे, हा प्रकार समाजव्यवस्थेला धोका ! |