Bangladesh Protest For Reservation : आरक्षणाची मागणी करणार्‍या १० सहस्रांहून अधिक लोकांना अटक !

  • विरोधी पक्षाचे ९ सहस्र नेते आणि कार्यकर्ते यांच्‍यावरही कारवाई !

  • विरोधी पक्षांकडून सरकारला उखडून फेकण्‍याची चिथावणी !

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशमध्‍ये थांबलेले आरक्षणाच्‍या मागणीचे आंदोलन पुन्‍हा चालू झाले आहे. अशातच ते रोखण्‍यासाठी शेख हसीना सरकारने मोठ्या प्रमाणात कारवाई चालू केली आहे. यांतर्गत गेल्‍या ३ दिवसांत १० सहस्रांहून अधिक लोकांना अटक करण्‍यात आली आहे. यामध्‍ये मुख्‍य विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्‍ट पार्टी’सह (‘बी.एन्.पी.’सह) अन्‍य विरोधी पक्षांचे एकूण ९ सहस्र २०० नेते अन् कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

१. आरक्षणातील कोटा दुरुस्‍तीच्‍या मागणीसाठी १ जुलैपासून चालू झालेल्‍या विद्यार्थी आंदोलनाने १८ जुलैपर्यंत हिंसक रूप धारण केले होते. यामुळे गेल्‍या २० दिवसांपासून देशातील प्राथमिक विद्यालये, तसेच महाविद्यालये अशा सर्वच शैक्षणिक संस्‍था बंद आहेत.

२. जमात, तसेच बी.एन्.पी.चे नेते हसीना सरकारला उखडून फेकण्‍याचे आवाहन करत आहेत. त्‍यांच्‍याकडून बांगलादेशचे गृह मंत्रालय हे पाकसमर्थक असून ते आतंकवादी कारवायांत सहभागी असल्‍याचा आरोप केला जात आहे.

३. असे असले, तरी कोणताही विद्यार्थी गट अथवा त्‍यांच्‍या नेतृत्‍वाने सरकार पाडण्‍याचे आवाहन केलेले नाही. विद्यार्थ्‍यांनी गृहमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्‍यासह हसीना सरकारमधील ६ मंत्र्यांच्‍या त्‍यागपत्राची मागणी केली आहे.

४. अशातच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचेही हिंसाचाराच्‍या संबंधाने नाव समोर आले आहे. तारिक यांनी पोलिसांच्‍या हत्‍येसाठी ७ सहस्र रुपये, तर अन्‍य एकाच्‍या हत्‍येसाठी ३ सहस्र ५०० रुपये देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍याचा त्‍यांच्‍या विरोधात आरोप आहे.