Himachal Another Cloudburst : हिमाचलमध्ये पुन्हा ढगफुटी : दोन दिवसांत ८ जणांचा मृत्यू, ४६ जण बेपत्ता
नवी देहली : हिमाचल प्रदेशात २ ऑगस्ट या दिवशी पुन्हा ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे लाहौल स्पितीच्या पिन व्हॅली येथे पूर आला. त्यात एक महिला वाहून गेली. पोलिसांना रात्री उशिरा महिलेचा मृतदेह सापडला.
याआधी १ ऑगस्टला हिमाचलमध्ये ५ ठिकाणी ढगफुटीमुळे मोठी हानी झाली होती. ढगफुटीमुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षादल, पोलीस आणि गृहरक्षक दलाचे सैनिक मोहीम राबवत आहेत.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट राज्यांत ‘रेड अलर्ट’ !
देशाच्या सर्व भागात मोसमी पाऊस सक्रीय आहे. हवामान खात्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये ३ ऑगस्ट या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून तेथे ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये २ ऑगस्टला पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती.
राजस्थानमध्ये अतीवृष्टीची चेतावणी !
राजस्थानमध्ये अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने ३ ऑगस्टला शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस चालू आहे.
आसाममध्ये पुरामुळे २ जणांचा मृत्यू !
आसाममध्ये पुरामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील ६ जिल्ह्यांतील १८ सहस्रांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यावर्षी आतापर्यंत राज्यात पूर, वादळ, वीज पडणे आणि दरड कोसळणे, या घटनांमुळे ११६ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.