Fresh Manipur Violance : मणीपूरमधील जिरीबाम येथे मैतेई आणि हमार समुदायांमध्‍ये शांतता करारानंतर पुन्‍हा हिंसाचार !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला !

इंफाळ : मणिपूरमधील जिरिबाममध्‍ये शांतता राखण्‍यासाठी मेतेई आणि हमार समुदायांमध्‍ये नुकताच शांतता करार झाला होता. या करारानंतर अवघ्‍या २४ तासांत जिरीबाम येथे पुन्‍हा हिंसाचार उसळला. जिरिबाममधील मैतेई कॉलनीत गोळ्‍या झाडण्‍यात आल्‍या. लालपाणी गावात एका घराला आग लावण्‍यात आली.

मैतेई आणि हमार समुदायांमध्‍ये जवळपास वर्षभर चालू असलेल्‍या हिंसाचारानंतर प्रथमच दोन्‍ही समुदायांनी जिरीबाम जिल्‍ह्यापुरती शांतता राखण्‍याचे मान्‍य केले होते. मैतेई आणि हमार समुदायांमध्‍ये १ ऑगस्‍टच्‍या सकाळी बैठक होऊन शांतता करारावर स्‍वाक्षरी झाली होती. या करारांतर्गत ‘जिरीबाम जिल्‍ह्यात जाळपोळ आणि गोळीबाराच्‍या घटना रोखण्‍यासाठी दोन्‍ही बाजू सुरक्षादलांना सहकार्य करतील अन् परिस्‍थिती पूर्ववत करण्‍यासाठी काम करतील’, असे निश्‍चित करण्‍यात आले होते.

या करारानंतर २ ऑगस्‍टच्‍या रात्री सशस्‍त्र लोकांनी गावातील एका घराला आग लावली आणि गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात सुरक्षादलांच्‍या सैनिकांना तैनात करण्‍यात आले आहे.

जरीबाम जिल्‍ह्यात यावर्षी जूनमध्‍ये शेतात एका शेतकर्‍याचा मृतदेह आढळल्‍यानंतर येथेही हिंसाचार चालू  झाला होता. दोन्‍ही बाजूंनी झालेल्‍या जाळपोळीच्‍या घटनांमुळे सहस्रावधी लोकांना त्‍यांची घरे सोडून छावण्‍यांमध्‍ये जावे लागले होते.