प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता !
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक होण्याच्या भीतीने खेडकर पसार !
पुणे – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीन याचिका देहली येथील पतियाळा न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून नियमबाह्य आरक्षणाचा लाभ मिळवला आहे का ? याचे अन्वेषण करण्याचे निर्देश न्यायालयाने ‘यु.पी.एस्.सी.’ला दिले आहेत. ‘यु.पी.एस्.सी.’मधील कुणी-कुणी पूजा खेडकर यांना तिच्या चुकीच्या गोष्टी करण्यास साहाय्य केले, याचीही पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी पूजा खेडकर यांना ‘यु.पी.एस्.सी.’ने दोषी ठरवून त्यांची उमेदवारी रहित केली आहे.
देहली येथील पतियाळा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी चालू असतांना ‘पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केला’, असा आरोप खेडकर यांनी केला होता. त्यावर डॉ. दिवसे यांनी आरोप खोडून काढले आहेत. खेडकर यांनी आरोप रचलेले असून प्रशासकीय भेटींमध्ये अधिकार्यांसमक्ष मी खेडकर यांना भेटलो होतो, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.
देहलीतील पतियाळा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारल्यानंतर पूजा खेडकर परदेशामध्ये (दुबई) पसार झाल्याची शक्यता अन्य वृत्तपत्रांनी व्यक्त केली आहे; मात्र याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खेडकर त्यांच्या नातेवाइकांसोबत परराज्यात लपली आहे का ? त्या अनुषंगाने देहली पोलिसांची पथके तिच्या मागावर आहेत.