वायनाडमधील भूस्खलन घटनेतून गोव्याने धडा घ्यावा !
ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची सूचक चेतावणी
पणजी – विकासाच्या प्रवाहात होणारी पर्यावरणीय हानी रोखणे अत्यावश्यक आहे. केरळमधील वायनाड येथे घडलेले विनाशकारी भूस्खलन पश्चिम घाटातील अनेक राज्यांसाठी आणि पर्यायाने गोव्यासाठीही धडा आहे. शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे. त्यांनी नमूद केलेली महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१. गोव्यात साट्रे, सत्तरी येथे वर्ष २०२१ मध्ये भूस्खलन झाले होते. याची शास्त्रीय चिकित्सा झाली होती का ?
२. हवामान पालटामुळे पश्चिम घाटात भूस्खलनाची शक्यता बळावली आहे.
३. अरबी समुद्राचे तापमान वाढत असल्याने पाऊस अनियंत्रित पडत आहे. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निसर्गपूरक धोरण अवलंबावे.
४. हवामान पालट आणि पर्यावरणाचे निकष यांकडे दुर्लक्ष केल्याने वायनाड येथे विनाशकारी भूस्खलन झाले.
५. पश्चिम घाट आणि कोकणच्या पर्वतरांगांमध्ये तमिळनाडूसह केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा यांचा सहभाग आहे. या राज्यांत ०.९ लाख चौरस किलोमीटर क्षेत्र भूस्खलनप्रवण आहे. गोव्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि अनियंत्रित बांधकामे हानीस कारण ठरू शकतात.