नवजात बाळाचा ‘स्‍मशान दाखला’ सिद्ध केल्‍याची यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती रुग्‍णालयात घटना !

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – येथील यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती रुग्‍णालयात एका महिलेने नवजात बालकाला जन्‍म दिला; मात्र त्‍या बाळाला आधुनिक वैद्यांनी मृत घोषित करून त्‍याचा ‘स्‍मशान दाखला’ सिद्ध केला. हे नवजात बाळ हे जिवंत असून ‘आयसीयू’ (अतीदक्षता विभाग) मध्‍ये उपचार घेत असल्‍याचे कागदपत्रांमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे असा गलथान कारभार करणार्‍या आधुनिक वैद्यांवर कारवाईची मागणी होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या वैद्यकीय विभागाने उत्‍कृष्‍ट कामगिरी करून महाराष्‍ट्रात दुसर्‍या क्रमांकावर स्‍थान मिळवले आहे; मात्र असे असले, तरी संबंधित आधुनिक वैद्यांवर कारवाई व्‍हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या प्रकरणी रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता राजेंद्र वाबळे यांच्‍याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. आयुक्‍त शेखर सिंह यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा दायित्‍वशून्‍य आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक !