थोडक्यात पण महत्वाचे : ठाणे येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; २ जण घायाळ, अतीधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा महापालिकेकडून खंडित….
ठाणे येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; २ जण घायाळ
ठाणे – पूर्व द्रुतगती महामार्गावर २ ऑगस्टच्या पहाटे डंपरचे चाक निकामी (पंक्चर) झाल्याने चालकाने भर रस्त्यात डंपर उभा केला होता. या वेळी मागून येणार्या ट्रकची डंपरला धडक बसली. ट्रकमागे असणार्या दुचाकीस्वाराची ट्रकला धडक बसली. या दुहेरी अपघातात दुचाकीस्वार वैभव डावखर (वय २७ वर्षे) याचा मृत्यू झाला, तर ट्रकमधील दोघे घायाळ झाले आहेत.
अतीधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा महापालिकेकडून खंडित
नवी मुंबई – महानगरपालिका सी–विभाग वाशी कार्यक्षेत्रातील अतीधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. वाशी विभागातील २५० हून अधिक घरांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहाबाज येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
खालापूर येथे गावकर्यांनी कमरेभर पाण्यातून मृतदेह नेला
खालापूर (जिल्हा रायगड) – खालापूर तालुक्यातील एका गावात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकर्यांनी कमरेभर पाण्यातून मृतदेह न्यावा लागला. या वेळी पाण्याचा प्रवाह जोरदार होता. त्यांना पाण्यातून जीव मुठीत धरून वाट काढून कसरत करत जावे लागले.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर गावात अशी स्थिती असणे दुर्दैवी ! |
शीव पूल बंद झाल्याने प्रचंड वाहतूककोंडी !
मुंबई – शीव स्थानकातील ११२ वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल १ ऑगस्टपासून बंद करण्यात आला. हा पूल सर्व वाहनांसाठी पुढील दोन वर्षे बंद असणार आहे. यामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. घाटकोपर ते शीव-चुनाभट्टीपर्यंत नियमित वाहतूक ठप्प होत आहे. जवळपास साडेचार किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली आहे. १० मिनिटांच्या प्रवासासाठी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत आहे.
विरार येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू !
विरार – येथे ‘हिट अँड रन’ घटनेत प्राध्यापिका आत्मजा राजेश कासट (वय ४६ वर्षे) यांचा मृत्यू झाला. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. २ ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी त्या रस्त्यावरून जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या टोयोटा फॉर्च्युनरने त्यांना धडक दिली. त्यात त्या गंभीर घायाळ झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चारचाकीचालक शुभम पाटील (वय २५ वर्षे) हा दारूच्या नशेत होता. या प्रकरणी गुन्हा नोंदवून शुभम पाटील याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकावाढती ‘हिट अँड रन’मुळे होणारी अपघातांची प्रकरणे पहाता तरुण पिढी संस्कारहीन होत असल्याचे द्योतक ! |