मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या आरक्षित जागेप्रकरणी १६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा डाव ! – नितीन शिंदे, माजी आमदार
|
सांगली, २ ऑगस्ट (वार्ता.) – शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेप्रकरणी १६ कोटी रुपये घोटाळा करण्याचा डाव रचलेला आहे. काही लाभार्थी मुसलमान समाजाचे नेते जातीय रंग देऊन मुसलमान आणि ख्रिस्ती समाजातील तरुणांची डोकी भडकावण्याचे काम करत आहेत. सामाजिक माध्यमांतून माझ्यावर आक्रमण करण्यास सांगितले जात आहे. मला जिवे मारण्यासाठी ८ ते १० कट्टर मुसलमान सिद्ध असल्याचे ते सांगत आहेत. नितीन शिंदे यांना संपवण्यासाठी वर्गणी काढून सुपारी द्या, अशा पद्धतीचे विकृत लिखाण केले जात आहे. त्यामुळे हे त्वरित थांबवून याला हिंदु-मुसलमान असा जातीय आणि धार्मिक रंग देऊ नये. या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होऊ देणार नाही. या प्रकरणी ६ ऑगस्ट या दिवशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उधळून लावू, अशी चेतावणी ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २ ऑगस्ट या दिवशी येथील ‘सर्किट हाऊस’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नितीन शिंदे पुढे म्हणाले की,
१. शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती समाजांसाठी आरक्षित असलेली जागा दफनभूमीसाठी देऊ नये, असा मी आवाज उठवला होता; मात्र ज्यांना या जागेतून पुष्कळ मोठा आर्थिक लाभ होणार आहे, असे काही लाभार्थी मुसलमान समाजाचे नेते माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
२. या जागेचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी नुकतीच अधिसूचना काढलेली आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्या जागेत अंदाजे १६ कोटी रुपयांचा घोटाळा होणार आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी एकत्र येऊन हा घोटाळा करण्याचा घाट घातलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.
३. ते म्हणाले की, घाईगडबडीत ही जागा भूसंपादन करण्यात येत आहे. ही जागा दफनभूमीसाठी योग्य नसून ती मृतदेहाची विटंबना करणारी आहे, तसेच मुसलमान समाजाचे धर्मगुरु आणि ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरु यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या जागेची पहाणी करावी.
४. या जागेवर पाणी आहे, तेथे दफनविधी होऊ शकतो का ? १६ कोटी रुपये हा जनतेचा पैसा आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आदेश असतांना या चौकशीचे पुढे काय झाले ?
५. ‘जीवन प्राधिकरणा’च्या अधिकार्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्या जागेवर जलवाहिनी घालायला गेल्यास पाण्याच्या दाबाने जलवाहिन्या वर येतात. ती जागा जलवाहिन्या घालण्यासाठी योग्य नाही. ती जागा दलदलीची आहे, असे असतांना जाणूनबुजून ही जागा दफनभूमीसाठी देण्याचा घाट घातला जात आहे.
६. यापूर्वी या प्रकरणी तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांना चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते; मात्र शासनाला त्यांनी कोणता अहवाल सादर केला, त्याची माहिती नाही. आजपर्यंत मी आयुष्यात अनेक खोटी प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
७. कोणत्याही परिस्थितीत पैसे वसूल केल्याविना गप्प बसणार नाही. महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा पडू दिला जाणार नाही. मुसलमान समाजाने कुणालाही भुलू नये.