रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधना शिबिरा’च्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘साधना शिबिरा’च्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्री. दिनेश सीताराम कडव, जालगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी.
१. साधकाने आश्रमात प्रवेश केल्यावर त्याच्या संपूर्ण देहात चैतन्याचा प्रवाह चालू होणे
‘१८.१.२०२४ या दिवशी मी आश्रमात प्रवेश केल्यावर मला लगेचच वेगळा पालट अनुभवायला येऊ लागला. माझ्या संपूर्ण देहात चैतन्याचा प्रवाह चालू झाला. मी स्वतःला पूर्ण विसरून गेलो.
२. श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतांना साधकाने तेथे प्रत्यक्ष गणराया असून तो भरभरून चैतन्य देत असल्याची अनुभूती घेणे
आश्रम बघतांना मी श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. तेव्हा तेथे मला ‘प्रत्यक्ष गणराया आहे आणि तो मला भरभरून चैतन्य देत आहे’, अशी अनुभूती आली. त्याच्या चरणी मी प्रार्थना केली, ‘या शिबिराचा मला आध्यात्मिक प्रगतीसाठी पूर्ण लाभ करून घेता येऊ दे.’ तेव्हा ‘मला गणराज आशीर्वाद देत आहे आणि माझ्या सहस्रारातून शक्ती देहात प्रवेश करत आहे’, असे मी अनुभवले.
३. श्री भवानीमातेच्या समोर नतमस्तक झाल्यावर साधकाला पुष्कळ शक्ती जाणवणे
श्री भवानीमातेच्या समोर नतमस्तक झाल्यावर मला पुष्कळ शक्ती जाणवली. आशीर्वाद देणार्या, क्षात्रवृत्ती असलेल्या, स्मितहास्य करणार्या आणि मनाला शांती देणार्या मातेच्या ठिकाणी मला ‘भावमुद्रा, चैतन्य आणि शक्ती’ अनुभवता आली.
४. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पंचतत्त्वांचे प्रयोग दाखवल्यावर ‘चैतन्य वाढले, तरच परिणामकारक सेवेतून आध्यात्मिक उन्नती होऊ शकते’, अशी साधकाला जाणीव होणे
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून आध्यात्मिक प्रयोग अनुभवता आले. सद़्गुरु काकांना पाहिल्यावर माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला. सद़्गुरु काकांनी पंचतत्त्वांचे प्रयोग दाखवल्यावर ‘साधना किती तळमळीने करायला पाहिजे’, याची मला जाणीव झाली. ‘स्वत:तील चैतन्य वाढले, तरच परिणामकारक सेवेतून आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकते’, याची मला जाणीव झाली. ‘शिबिरातील प्रयोगांतून परिपूर्ण साधनेचे ध्येय घ्यायचे आहे’, हे मला शिकायला मिळाले.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना दैनिकाला आणि भोवताली पूर्ण वातावरणात दैवी सुगंध येणे
१९.१.२०२४ या दिवशी दुपारी स्वागतकक्षातील भगवान श्रीकृष्णाच्या चित्राजवळ असलेल्या आसंदीवर बसून मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होतो. तेव्हा मला जवळजवळ ३० मिनिटे दैनिकाला आणि माझ्या भोवताली पूर्ण वातावरणात दैवी सुगंध येत असल्याची अनुभूती आली. असाच दैवी सुगंध रात्री बाहेरील बाजूस वाहनाची वाट पहात असतांनाही अनुभवला.
६. प्रायोगिक भागाच्या सादरीकरणाच्या वेळी साधकाने स्वतः काहीच बोलत नसून, सगळे काही गुरुदेवच करून घेत असल्याचे अनुभवणे
२०.१.२०२४ या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने मला शिबिरातील प्रायोगिक भागामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. जिज्ञासूच्या भूमिकेत सूत्रे मांडण्याच्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, माझी क्षमता नाही. आम्हा सर्व साधकांना काय शिकणे अपेक्षित आहे, ते आपणच या क्षुद्र जिवाच्या माध्यमातून मांडून घ्या.’ मी गुरुदेवांना पूर्ण शरण गेलो. प्रायोगिक भागाच्या सादरीकरणाच्या वेळी ‘मी काहीच बोलत नसून, सगळे काही गुरुदेवच करून घेत आहेत’, हे मी अनुभवले. त्या सेवेतील आनंदही गुरुदेवच मला अनुभवायला देत होते.
गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
सौ. ज्योती गजानन अर्धापूरकर, यवतमाळ
१. जाणवलेली सूत्रे
अ. ‘मला आश्रमातील प्रत्येक साधक दैवी लोकांतील असून आनंदी असल्याचे जाणवले.
आ. ‘नियोजन, कार्यपद्धत आणि वेळेचे पालन कसे करायचे ?’, यासंबंधी पुष्कळ शिकायला मिळाले.
इ. ‘श्रीरामतत्त्व प्रक्षेपित होत असलेल्या साक्षात् सनातन आश्रमरूपी अयोध्येत येण्याची संधी देऊन देवाने या जिवावर कृपा केली’, असे मला वाटले.
२. आलेल्या अनुभूती
अ. ‘शिबिराच्या आदल्या दिवशी सत्संग चालू असतांना ‘चंदनाचा दैवी सुगंध’ येत होता. त्या वेळी मला शांत वाटले.
आ. श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये प्रत्यक्ष ‘श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवून पुष्कळ चैतन्य माझ्याकडे येत आहे’, असे मला जाणवले.
इ. दुसर्या दिवशी मार्गदर्शन चालू असतांना ‘दैवी प्रकाशाच्या वलयांमध्ये सर्व शिबिरार्थी साधक बसले आहेत’, असे मला स्पष्टपणे दिसले.
ई. आश्रम बघत असतांना भिंतीवरील दैवी आकृती पहातांना तेथे मला प्रकाशाची ज्योत दिसली. बर्याच ठिकाणी मला देवीचे अस्तित्व जाणवले.
उ. आई जगदंबेचे दर्शन घेतांना ‘ती मला जवळ घेत असून तिच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याने मला आशीर्वाद देत आहे’, असे जाणवले.
ऊ. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दाखवलेले प्रयोग पहात असतांना सगळीकडे चंदनाचा सुगंध येत होता. संतांचे दर्शन होऊन त्यांच्या अस्तित्वाने मला आध्यात्मिक लाभ झाले.
भगवंताने शिबिरात येण्याची संधी दिली आणि ३ दिवस श्रीरामाच्या उत्सवकाळात प्रभु श्रीरामरूपी प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चैतन्यात ठेवून अन् शक्ती देऊन माझ्यावर कृपा केली, त्यासाठी कोटीशः कृतज्ञ आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जानेवारी २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |