आत्मघाती खेळ !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथील किवळे भागात दहावीत शिकणार्या एका मुलाला ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाचे व्यसन जडले होते. या व्यसनाच्या आहारी जाऊन या १५ वर्षांच्या मुलाने २६ जुलैच्या रात्री थेट १४व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. गेल्या ६ मासांपासून हा मुलगा या खेळाच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला शयनकक्षामध्ये ३-३ घंटे कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. हा पालट पाहून आई-वडीलही चिंतेत होते.
‘ब्ल्यू व्हेल’सारख्या असंख्य खेळांच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणार्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ हा एक भ्रमणभाषमधील आत्मघाती खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याकडून काही आव्हाने दिली जातात, उदा. हातावर ब्लेडने आकार बनवणे, रात्री घरातून एकटे बाहेर पडणे, स्वतःला त्रास देणे इत्यादी. आत्महत्या करणे हे त्यातील शेवटचे आव्हान आहे. अनेकांच्या जिवावर बेतलेल्या राक्षसी ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ खेळावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे; मात्र या खेळाचा धोका कायम असून अधिक तीव्रतेने हा खेळ फोफावत आहे. किशोरवयीन मुले ‘ब्ल्यू व्हेल’च्या जाळ्यात फसत असून ते याला ‘खेळ’ समजत आहेत; मात्र प्रत्यक्षात तो खेळ नाही कि ‘अॅप’ही नाही. हा गुन्हेगारी प्रकारातील लोकांचा सापळा आहे, ज्यांनी आतापर्यंत जगभरात १३० हून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. लहान मुले नकळत याला फसतात. या खेळावर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी अशी बंदी घालणे अशक्य असल्याचे मत इंटरनेट तज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘खेळासाठी कोवळ्या वयातील मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे’, हे आश्चर्यकारक आहे. त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणारे किंवा तशी परिस्थिती निर्माण करायला लावणारेही किती घातक आणि आसुरी असतील, याची कल्पनाही करवत नाही.
योग्य संस्कारांच्या अभावामुळे, तसेच नको त्या गोष्टी कोवळ्या वयात हाती आल्यामुळे मुले विकृत बनत आहेत. पालकांनी मुले ‘इंटरनेट’वर काय शोधतात ? याकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे डोळे, कान कमकुवत होतात. भ्रमणभाषच्या माध्यमातून उत्सर्जक किरणांचा घातक परिणाम होतो. हे सर्व टाळण्यासाठी मुलांवर सुसंस्कार करणे आणि त्यांना साधनेची गोडी लावणे आवश्यक आहे. नामजपाने विकारांवरही नियंत्रण ठेवता येते. या बैठ्या जीवघेण्या खेळांऐवजी पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास उद्युक्त करावे. भ्रमणभाषचे दुष्परिणाम लक्षात घेता मुलांना वाचण्याची, तसेच दिवेलागणीच्या वेळेस ‘शुभंकरोति’, ‘आरत्या’, ‘स्तोत्र’ म्हणण्याची सवय लावू शकतो. त्यामुळे मुले आपोआपच भ्रमणभाषपासून दूर रहातील.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे