साधनेला आरंभ केल्यावर सर्वांविषयी प्रेम आणि सेवेतील आनंद अनुभवणारे नाशिक येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) !
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्याने टप्प्याटप्प्याने सर्वांविषयी जवळीक वाटू लागणे
१ अ. सजिवांच्या समवेत निर्जीव वस्तूंविषयीही प्रेम वाटणे : ‘पूर्वी मला केवळ घरातील लोक आणि नातेवाईक यांच्याबद्दल प्रेम वाटायचे. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर मला सनातनच्या साधकांविषयी प्रेम वाटू लागले. आता मला इतर संप्रदायांतील साधकसुद्धा जवळचे वाटू लागले आहेत. ‘त्यांच्यामध्ये ईश्वराचा, गुरूंचा अंश आहे’, या भावाने माझे त्या साधकांशी बोलणे आणि वागणे होऊ लागले. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळू लागला.
कार्यालयात पुष्कळ लोक मला भेटण्यासाठी येतात. तेव्हा ‘ओळखीची किंवा अगदी नव्याने भेटलेली व्यक्तीसुद्धा आपलीच आहे’, असे मला वाटू लागले आहे. नंतर हळूहळू मला सर्वांविषयी जवळीक वाटू लागली.
मनुष्य आणि प्राणी यांच्याप्रमाणेच मला निर्जीव वस्तूंविषयीही प्रेम वाटत आहे. ‘या वस्तूंमध्ये ईश्वरी अंश आहे. या वस्तू माझ्या सहसाधक बंधू-भगिनी आहेत’, अशी माझी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी निर्माण होत आहे. माझ्या मनात प्रत्येक वस्तूबद्दल आदरभाव आणि प्रेमभाव निर्माण झाला आहे.
१ आ. गुरुकृपेने ‘अवघे विश्वची माझे घर ।’, या संतवचनाची अनुभूती येणे : मी पूर्वी विविध ग्रंथांचे वाचन करायचो. तेव्हा त्या ग्रंथांत मी वाचले होते, ‘साधना केल्यावर आपल्यात प्राणीमात्रांविषयी प्रेम निर्माण होते, त्यांच्याविषयी आपुलकी वाटू लागते आणि आपल्या मनाला हळूहळू ‘अवघे विश्वची माझे घर ।’, ही अवस्था प्राप्त होण्यास आरंभ होतो.’ ‘प.पू. गुरुदेवांनी साधनेच्या संदर्भात दिलेले दृष्टीकोन आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न’, यांमुळे मला ही स्थिती अनुभवता येत आहे.
१ इ. सर्व घटनांकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहाता आल्याने आनंद मिळणे : आजूबाजूला जरी नकारात्मक घटना घडत असल्या, तरी गुरुदेवांच्या कृपेने साधनेचे दृष्टीकोन स्पष्ट असल्यामुळे आणि प्रत्येक घटना किंवा प्रसंग यांकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहाता येत असल्याने ‘माझे मन आनंदी आहे’, असे मला जाणवते.
२. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने आता माझे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होत आहेत. परिणामी ‘माझे मन शांत आणि आनंदी अन् शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटत आहे.
३. आता मला ‘स्वतः आनंदी रहाणे आणि इतरांना आनंद देणे’, अशी स्थिती अनुभवता येत आहे.
४. संधी मिळाल्यावर प्रत्येक ठिकाणी साधना सांगणे आणि कर्तेपणा ईश्वराला अर्पण करता येणे
प.पू. गुरुदेवांनी सांगितलेल्या ‘Sky is the Limit’, या म्हणीनुसार आपल्याला संपूर्ण जग अध्यात्मप्रसार करण्यासाठी उपलब्ध आहे. (अध्यात्मप्रसार करण्यासाठी कोणतीही सीमा नाही.) मला कार्यालयात अथवा समाजात विविध कार्यक्रमांमध्ये भाषण करण्याची संधी मिळते. त्या वेळी ‘अध्यात्म हा विषय घेतल्याविना माझे भाषण पूर्ण होत नाही’, असे माझ्या लक्षात आले. गुरुकृपेने जेथे संधी मिळेल, तेथे माझ्याकडून साधना सांगण्याची सेवा होते. ‘हे ईश्वरी कार्य असल्याने आपण निमित्तमात्र असतो’, हे लक्षात आल्याने कर्तेपणा ईश्वराला अर्पण केला जातो.
‘माझ्या भाग्याने मला गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळाली आहे आणि साधना केल्याने माझे मन आनंदी होत आहे’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे), नाशिक (३१.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |