भारतीय संस्कृतीतील वैवाहिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्त्रीविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून चुकीचा प्रचार, विधात्याने निर्माण केलेली स्त्रीच्या शरिराची रचना, स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष, स्त्रियांसमोर असलेल्या आपत्ती, स्त्रीचे वैवाहिक जीवन आणि गर्भारपण, द्रव्यलालसेपोटी हुंडा मागणे अन् स्वतः निवड करूनही पाश्चात्त्य देशांत घटस्फोटांचे प्रमाण अधिक, तर भारतात ते न्यून का ?’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक २९)
७. विवाहाचा वैविध्यपूर्ण परिणाम !
पहिली गोष्ट ज्या समाजात, ज्या संस्कृतीत, ज्या परंपरेत उभय वधू-वर उत्पन्न झाले, त्यांचे ते अविभाज्य घटक आहेत. तो समाज आणि संस्कृती यांचे संवर्धन करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यातच त्यांचे हित आहे. विवाह म्हणजे प्रासंगिक गोष्ट नसून ती आयुष्याची गोष्ट आहे. इतकेच नाही, तर पुढच्या पिढ्यांच्या आयुष्याशीही तिचा घनिष्ठ संबंध आहे. समजा, निवड चुकली आणि एखाद्या स्त्रीला ‘एड्स’ रोग झालेला नवरा लाभला, तर तिच्या आयुष्याचे मातेरे ठरलेलेच आहे; पण तिला होणार्या संततीचेही जीवन दुःखमय होणार आहे. आई-वडिलांच्या गुण-दोषांचा परिणाम संततीवर होतोच आणि ती संतती ज्या समाजाचा एक घटक आहे, त्या समाजावरही परिणाम होतो.
८. लग्नाच्या वेळी स्त्री आणि पुरुषाचे वय किती असावे ?
‘वधू-वरात किती अंतर असावे ?’, असा प्रश्न आल्यास सामान्यतः पुरुष तरुण असावा आणि त्याला शोभण्याइतपत ती युवतीही तरुण असावी. पुरुषाचे वय आपण २४ धरले, तर ती १८ वर्षांची असावी. ६ वर्षांचे अंतर चांगले ! ८ वर्षे असायलाही हरकत नाही; पण पुष्कळ अल्प नसावे. लग्नाचे वयही याच्या आसपास असावे. प्रेमविवाहात हे अंतर सामान्यतः अल्प असते. ते उचित नाही. लग्नाचे वय पुष्कळ अधिक नसावे.
९. भारतीय संस्कृतीने सांगितलेले मुलीचे वय !
भारतीय संस्कृतीने मुलीचे लग्न ती वयात येताच लवकरात लवकर व्हावे, असे मानले आहे. मिस् एलन की म्हणतात, ‘‘No form of Love is more beautiful than that in which two young persons come together at such a stage, when they do not know, when there feeling was born’’, म्हणजे आपल्या दोघांत आकर्षणाची भावना केव्हा उत्पन्न झाली, हे कळण्यापूर्वीच्या अवस्थेत युवक-युवती एकत्र येतात, यासारखा प्रेमाचा दुसरा प्रकार असू शकत नाही.
१०. पती-पत्नीची निवड योग्य असावी !
अशा या प्रेमी युगुलाचे लग्न यशस्वी व्हायला हवे असेल, तर त्यांची निवड अगदी काटेकोर व्हायला हवी. ही निवड त्यांची त्यांच्यावरच सोपवली, तर परदेशात जसे लग्नापूर्वीच दोन-चार घटस्फोट होतात, तसे व्हायचे. एकदा लग्न झाले की, मागची सगळी पापे धुतली जातात, असा समज तेथे रूढ झाला आहे.
इंग्लंड आणि त्याच्या परिसरात एक विचार मूळ धरू लागला आहे की, मागील सर्व अनैतिक कृत्यांना रहित करण्याचे सामर्थ्य विवाह समारंभात आहे. पती-पत्नीची योग्य निवड केवळ अनुभवी आणि सर्वांगांचा विचार करणारे, तसेच आपल्या अपत्यांवर अत्यंत प्रेम करणारे आई-वडीलच करू शकतात.
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)