India US Relations: जागतिक स्तरावर सहयोगी म्हणून आमचे भारताशी भक्कम संबंध ! – अमेरिका
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत ही एक महान शक्ती आहे. भारत कधीही अमेरिकेचा औपचारिक मित्र किंवा भागीदार होणार नाही; परंतु याचा अर्थ असा नाही की, जागतिक स्तरावर सहयोगी म्हणून आमचे भक्कम संबंध असू शकत नाहीत, असे विधान अमेरिकेचे उप परराष्ट्र सचिव कर्ट कॅम्पबेल यांनी केले. ते पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को दौर्याविषयी खासदार जेम्स रिश यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियानंतर या महिन्याच्या अखेरीस युक्रेनची राजधानी कीव शहराला भेट देण्याची शक्यता आहे’, असेही कॅम्पबेल म्हणाले.
कर्ट कॅम्पबेल पुढे म्हणाले की, जगात फार कमी देश आहेत ज्यांनी ‘ग्लोबल साऊथ’सारखे आवाहन केले आहे. ग्लोबल साऊथमध्ये भारताची क्षमता अतुलनीय आहे. (ग्लोबल साऊथ म्हणजे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील देश, आफ्रिकेतील देश, भारतीय उपखंडातील देश, आखाती देश, चीन आदी देशांचा समूह) आम्हाला आफ्रिकेसमवेतही काम करायचे आहे. त्यादृष्टीने ही अमेरिकेसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. माझा विश्वास आहे की, भारतातील बहुतेक लोकांना अमेरिकेशी चांगले संबंध हवे आहेत. आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी ते कृतज्ञ आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञान यांमध्ये आम्ही एकत्र केलेले काम त्यांना आवडत आहे.
संपादकीय भूमिकास्वतःच्या लाभासाठी अमेरिकेला भारताशी संबंध हवे आहेत; मात्र भारताच्या विरोधात कारवाया करणार्या खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचे काम अमेरिका करत आहे. यावरून तिचा दुटप्पीपणा लक्षात येतो ! |