Meitei Kuki Peace Aagreement : ख्रिस्‍ती कुकी आणि हिंदु मैतेई यांच्‍यात झाला शांतता करार !

मणीपूरमधील भाजप सरकारच्‍या प्रयत्नांना यश !

नवी देहली – गेल्‍या वर्षीच्‍या मे महिन्‍यापासून मणीपूरमधील ख्रिस्‍ती कुकी आणि हिंदु मैतेई समुदायांमध्‍ये हिंसाचार चालू आहे. जवळपास वर्षभर चालू असलेल्‍या हिंसाचारानंतर प्रथमच दोन्‍ही समुदायांनी जिरीबाम जिल्‍ह्यापुरती शांतता राखण्‍याचे मान्‍य केले आहे. अशांत राज्‍यात शांतता प्रस्‍थापित करण्‍यात अपयशी ठरल्‍यावरून मणीपूरच्‍या भाजप सरकारवर सर्व थरांतून टीका होत असतांना सरकारला मिळालेले हे पहिले यश आहे, असे म्‍हटले जात आहे.

१. मैतेई आणि कुकी गटांमध्‍ये १ ऑगस्‍टच्‍या सकाळी बैठक होऊन शांतता करारावर स्‍वाक्षरी झाली. या करारावर दोन्‍ही बाजूंनी स्‍वाक्षरी होण्‍यातून संपूर्ण राज्‍याला शांततेचा संदेश गेला आहे.

२. या करारांतर्गत जिरीबाम जिल्‍ह्यात जाळपोळ आणि गोळीबाराच्‍या घटना रोखण्‍यासाठी दोन्‍ही बाजू सुरक्षा दलांना सहकार्य करतील अन् परिस्‍थिती पूर्ववत करण्‍यासाठी काम करतील.

३. या बैठकीला केंद्रीय राखीव पोलीस दल, आसाम रायफल्‍स आणि जिल्‍हा आयुक्‍त उपस्‍थित होते.

४. राज्‍य सरकारच्‍या सूत्रांनी सांगितले की, सध्‍या आम्‍ही एका जिल्‍ह्यापुरते मर्यादित आहोत. आमचे अंतिम लक्ष्य राज्‍यात शांतता प्रस्‍थापित करणे आणि परिस्‍थिती पूर्वपदावर आणणे, हे आहे.

५. आता दोन्‍ही पक्षांमधील पुढील बैठक १५ ऑगस्‍टनंतर होणार आहे.

६. यापूर्वी राज्‍याचे मुख्‍यमंत्री बिरेन सिंह यांनी विधानसभेत सांगितले होते की, सरकार शांतता चर्चेसाठी कठोर परिश्रम घेत आहे आणि आसामच्‍या जिरीबाम जिल्‍ह्याच्‍या सीमेवर असलेल्‍या सिलचरमध्‍ये अनेक चर्चा झाल्‍या आहेत. यासंदर्भात लवकरच घोषणा करण्‍यात येईल.

हिंसाचारामुळे आतापर्यंत एकूण २२६ जण ठार !

मे २०२३ पासून राज्‍यात चालू असलेल्‍या हिंसाचारामुळे आतापर्यंत एकूण २२६ लोक मरण पावले असून ३९ जण बेपत्ता आहेत. ५९ सहस्र ४१४ लोक तात्‍पुरत्‍या छावण्‍यांमध्‍ये रहात आहेत. ११ सहस्र १३३ घरे जाळण्‍यात आली असून हिंसाचाराच्‍या संदर्भात विविध पोलीस ठाण्‍यांत ११ सहस्र ८९२ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.