Chinese Nationals Arrested : नेपाळमधून भारतात घुसलेल्या २ चिनी नागरिकांना अटक !
दोघांना साहाय्य करणार्या भारतीय नागरिकालाही अटक
महाराजगंज (उत्तरप्रदेश) – भारत-नेपाळ यांच्यातील सोनौली सीमेवर २ चिनी नागरिकांना पकडण्यात आले. त्याच्यासमवेत तिबेटी वंशाचा एक निर्वासितही सापडला. पोलिसांना त्यांच्याकडे ओळखपत्र म्हणून भारतीय आधार कार्ड सापडले. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील २ वेगवेगळ्या पत्त्यांवर त्यांनी आधार कार्ड बनवले होते. यामध्ये त्यांना देहलीत रहाणार्या तिबेटी वंशाच्या भारतीय नागरिकाने साहाय्य केले होते. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
सुरक्षादलांनी पकडल्यानंतर हे दोघे ते मुके असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र सैनिकांनी सखोर चौकशी केल्यावर ते बोलू लागले. आधी त्यांनी ते औषध बनवण्याचा व्यवसाय करत असून वनौषधींच्या शोधात भारतात आल्याचे सांगितले; मात्र सुरक्षादलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पारपत्र पडताळल्यावर ते चिनी नागरिक असल्याचे उघड झाले. यामध्ये एकाचे नाव जू वाक्यांग, तर दुसर्याचे नाव यांग मेंगमेंग असल्याचे आढळून आले. त्यांना भारतात रहाण्याची व्यवस्था तिबेटी वंशाच्या लुवसांग त्सेरिंग याने केली होती. त्यांना गोरखपूरला पाठवण्याचे दायित्वही त्याच्याकडे होते. या कामासाठी त्याने चिनी नागरिकांकडून ४० सहस्र रुपये घेतले होते.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांमुळेच भारताला सर्वाधिक धोका आहे. अशांना फाशीचीच शिक्षा करायला हवी ! |